कृष्णानगर – पुणे-बंगळुरू महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उड्डाण पुलाखालील जागेत सुरू असलेले सुशोभिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या सुशोभिकरणात नाना-नानी पार्क, जॉगिंग ट्रॅक, उद्यान, ओपन जिम, शौचालय, पोलीस मदत केंद्र यांचा समावेश असून, या कामाची निविदा पाच कोटी रुपयांची असून, हे काम पुणे येथील सोनाली कन्ट्रक्शन मार्फत सदर काम सुरू आहे. म्हावशे पेट्रोल पंपासमोर बांधण्यात आलेले शौचालय बांधून वापराविना पडून आहे. या शौचालयाबाहेर दोन्ही बाजूंचा वापर सार्वजनिक मुतारीसारखा होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तेथून नागरिकांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. उड्डाण पुलाचा पूर्व व पश्चिम भाग जोडणार्या गाळ्यांमध्ये करण्यात आलेले काँक्रिट उखडल्याने दुचाकी वाहने घसरत आहेत. हे काम रेडीमिक्स काँक्रिटद्वारे करण्याची अट निविदेमध्ये असूनसुद्धा हे काम मनुष्यबळ वापरून करण्यात आले आहे. कामे अर्धवट असताना संपूर्ण रंगरंगोटी का करण्यात आली आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील कामाची दिरंगाई, निकृष्ट दर्जा यावरून पालिकेचा बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे.