सातारा : पाझर तलाव, बंधारे यांच्या निधीची चौकशी उपसरपंच खंडागळे यांची ग्वाही

टाकळीभान – टाकळीभानचा पाणीप्रश्न, घरकुल प्रश्न व वाचनालयाचा प्रश्न सोडविण्यात येतील तसेच पाझर तलाव, बंधारे यांच्या निधीची चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिली.
टाकळीभान ग्रामपंचायतने २६ जानेवारी रोजीआयोजित केलेल्या ग्रामसभेत कान्हा खंडागळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या. बसस्थानकाची जागा निश्चित होत नसल्याने बसस्थानकाचे काम रखडले आहे. खळवाडी परिसरात असलेल्या बारवेचे काम सुरू करण्यात येईल. पत्रकार भवनासाठी जागा देण्यात येईल व निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडलेले सर्व प्रश्न सोडविले जातील, असे खंडागळे यांनी सांगितले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी आर.एफ.जाधव यांनी अहवाल वाचन केले. तर पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. कोकणे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राम बोरूडे यांनी केंद्रामार्फत ग्रामस्थांना देण्यात येणार्या सुविधाबाबत माहिती दिली. यावेळी अर्जुन राऊत, बाबासाहेब पटारे, गोलवड, मंगल कोकणे, बंडू हापसे, बाळासाहेब दुधाळे, नारायण काळे, काकासाहेब कोकणे, बापूसाहेब नवले, अण्णासाहेब दाभाडे, खरात, सुप्रिया धुमाळ, बापूसाहेब शिंदे, शिवाजीराव शिंदे यांनी समस्या मांडल्या.
निधीबाबत चौकशी करा
टाकळीभान येथील पाझर तलावाच्या भिंतीचे काम निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे. येथील बंधार्यांच्या कामासाठी मोठा निधी आला मात्र, बंधार्यांची कामे न होताच हा निधी मात्र खर्च झाला असल्याने या निधीबाबत चौकशी करावी, अशी मागणी नारायण काळे, काकासाहेब कोकणे, बापूसाहेब नवले यांनी केली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांची दांडी श्रीरामपूर तालुक्यातील सर्वांत मोठी टाकळीभान ग्रामपंचायत असून यामध्ये एकूण १७ सदस्य असून, प्रत्येक ग्रामसभेच्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य कमी प्रमाणात हजर असतात. जास्त प्रमाणात गैरहजर असतात. त्यामुळे निवडून दिलेले सदस्यच ग्रामसभेला हजर राहत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी समस्या माडांवी, कुणासमोर हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे .





