Satara Temperature : सातारा धगधगले! पारा ३७ अंशांवर; पुढील आठवड्यात ४१ अंशांची ‘हिटवेव्ह’ येणार?
Satara Temperature : दुपारी १२ नंतर रस्त्यांवर शुकशुकाट; ३७ अंशांच्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत, वाढत्या उष्म्याचा बाजारपेठेवरही परिणाम.

Satara Temperature – जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली असून उन्हाच्या झळांमुळे नागरिक त्रस्त होऊ लागले आहेत. तापमानाचा पारा 37 अंश सेल्सियसवर पोहचल्याने उन्हाचा चटका हैराण तरत आहे. या उन्हाच्या झळा आरोग्यालाही बसू लागल्या आहेत. वाढत्या उष्म्यामुळे शीतपेये, रसरशीत फळांचा आस्वाद घेण्याचे प्रमाण वाढले आहे. डोक्यावर टोपी, तोंडाला रुमाल बांधून सर्व जण प्रवास करत आहेत.
विविध उपाययोजनांतून उष्माघातापासून बचाव करण्यासाठीचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात सातार्यात उष्णतेची लाट आली होती. तापमान 40 अंश सेल्सियसवर पोहोचले होते. यंदाही तापमान वाढून पुन्हा उष्णतेची लाट येईल असा अंदाज बांधला जात आहे. कारण शनिवारी तापमान 37 अंश सेल्सियसवर पोहचले आहे.
एप्रिल महिना संपायला अजूनही 18 दिवस आहेत. हवामान खआत्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार हे तापमान सुमारे ३९ ते ४१ अंश सेल्सियसवर पोहोचणार आहे. नंतर मे महिना सुरु होणार आहे. या उन्हाळ्यामुळे वाढत्या उष्म्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक बनले आहे.
काहिलीमुळे अंगातून घाम जात असल्याने शरीरातील पाणी पातळी कमी होत आहे. ती वाढवण्यासाठी अधिक पाणी पिण्याबरोबरच लिंबू, कोकम तसेच इतर सरबत पिण्यावर भर देणे आवश्यक आहे. बाजारपेठेत कलिंगड, द्राक्ष, टरबूज, संत्री, मोसंबी, पपई अशी रसरशीत फळे विक्रीसाठी आली आहेत. आवक कमी जास्त होत असल्याने दरात चढउतार होत आहेत.
तरी देखील खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. उन्हातून प्रवास करताना टोपीचा वापर वाढला आहे. महिला रुमालाचा वापर करत आहेत. दुपारी 12 नंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हातून प्रवास टाळण्यात येत असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे.





