Satara : वाईतील श्री कृष्णाबाई उत्सवाची आजपासून सुरुवात

वाई : वाईतील श्री कृष्णाबाईच्या पारंपारिक उत्सवास गुरुवारपासून (दि. ३०) भीमकुंड आळीतील उत्सवाने प्रारंभ होत आहे. यानिमित्त कृष्णानदी सेवा कार्य समितीच्या वतीने घाट स्वच्छ करण्यात आला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रसाद कुलकणी व कार्याध्यक्ष उमेश रास्ते यांनी दिली.
कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच करमणुकीच्या सांस्कृतिक व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री कृष्णाबाई घाट भीमकुंड आळी ऊर्फ भीमाशंकर घाट संस्थान उत्सवात गुरुवारी (दि. ३०) सकाळी आठ श्री कृष्णाबाई मूर्ती भीमकुंड आळी वाजता उदकशांत, त्यानंतर सकाळी दहा वाजता ‘श्री’चा छबिना निघणार आहे. त्यानंतर ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होणार आहे. चार दिवसांच्या या उत्सवात शुक्रवारी (दि. ३१) दुपारी ३ वाजता मंत्रजागर (पुरुष), ४ वाजता मैत्रयी गुप यांचे ‘श्रीसुक्त पठण’, अर्चना सतीश कर्णे यांचे कथ्थक नृत्य, रात्री साडेनऊ वाजता युवोन्मेष मंडळ, पुणे यांचा ‘स्वरसंध्या’ हा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (दि. १) सकाळी ११ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता मुरलीधर भजनी मंडळाचे भजन, रात्री ९.३० वाजता श्री. निरंजन मनमाडकर यांचे ‘महिषासुर’ आख्यान या विषयावर प्रवचन होणार आहे. रविवारी (दि. २) सकाळी १० ते १२ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. दुपारी स्वरताल संगीत विद्यालय, यशवंतनगर यांचे भजन, कृष्णाई भजनी मंडळ यांचे भजन, सायंकाळी पाच वाजता वीरशैव महिला मंडळ यांचे श्री सूक्त पठण, हळदी-कुंकू व साडी लिलाव, रात्री साडेनऊ वाजता कौस्तुभ वैद्य यांचे लळिताचे कीर्तन होणार आहे.
कृष्णानदी पात्राची स्वच्छता
गेली नऊ वर्षे कृष्णा नदी सेवाकार्य समितीच्यावतीने प्रत्येक रविवारी नदीच्या स्वच्छतेचे अभियान राबवते. कृष्णाबाई उत्सवाचे आैचित्य साधूम सेवाकार्य समितीने भीमकुंड आळी घाटावरील कुंड, नदी पात्र व परिसराची स्वच्छता केली. या अभियानात समितीचे अध्यक्ष नितीन कदम, सचिव काशिनाथ शेलार, खजिनदार भारत खामकर, संस्थानचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सचिव प्रशांत कुलकर्णी, पंच स्वरूप मुळे, समितीचे सदस्य कुमार पवार, प्रा. समीर पवार, गिरीष जाधव, साै. जाधव, अमाेल मुळीक, डाॅ. अमित जमदाडे, अतुल वाईकर तसेच सदस्यांनी सहभाग घेतला.





