Satara : झेडपीचा आजपासून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव शुक्रवारी (दि. १०) ते ते रविवार (दि. १२ ) जानेवारी अखेर साजरा होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार सकाळी ९ वाजता छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल सातारा येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मंत्रीगण, लाेकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
क्रीडा महोत्सवास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, खा. उदयनराजे भोसले, खा. धैर्यशिल मोहिते पाटील, खा. नितीन पाटील, आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. जयंत आसगावकर, आ. अरुण लाड, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शुभारंभ कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांनी केले आहे.
महोत्सवात बरेच काही
वैयक्तिक क्रीडा स्पर्धा प्रकारात १०० मीटर, २०० आणि ४०० मीटर धावणे, लांबउडी, गोळाफेक, थाळीफेक, बॅडमिंटन एकेरी, टेबल टेनिस एकेरी, कॅरम, बुद्धिबळ अशा स्पर्धा महिला व पुरुष या दोन्ही गटात होणार आहेत. सांघिक क्रीडा स्पर्धांत क्रिकेट पुरुष, कबड्डी महिला-पुरुष, व्हॉलीबॉल पुरुष, थ्रो बॉल महिला, रस्सीखेच पुरुष, महिला, खो-खो पुरुष/महिला, ४x१०० रिले पुरुष/महिला अशा स्पर्धा होणार आहेत. क्रिकेटच्या प्रत्येक संघात एक महिला असणार आहे. दि. १० रोजी सकाळी ८ ते सायं ५ वाजेपर्यंत मैदानी व सांघिक खेळांच्या स्पर्धा सुरू होतील. दि. ११ रोजी मैदानी, सांघिक स्पर्धा व सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दि. १२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत क्रीडा पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती नागराजन यांनी दिली.





