सातारा -सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची आगामी निवडणूक शिवसेना लढवणार आहे. या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनेल तयार करण्यात येणार असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
पोलीस महासंचालक पदक मिळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कारासाठी ना. देसाई साताऱ्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी प्रसामाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा केली. यावेळी युवा नेते यशराज देसाई उपस्थित होते.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढली असून, त्याचा उपयोग करून आम्ही जिल्ह्यातील आगामी निवडणुका लढवणार आहे. सर्वांत आधी जिल्हा बॅंकेची निवडणूक होणार असून, ती लढवण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.
सक्षम पर्याय देण्यासाठी सर्वसमावेशक पॅनेल तयार करण्यात येणार आहे. याबाबत पक्षाचे आमदार व पदाधिकाऱ्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
पोलिसांच्या घरांसाठी राज्य सरकार आग्रही असून, या घरांचे बांधकाम दर्जेदार असेल. ज्या पोलीस वसाहती राहण्यायोग्य नाहीत, त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णयदेखील तातडीने घेण्यात येईल.