सातारा – शासनाच्या सहभागाने साताऱ्यात होणार शाही दसरा

सातारा – कोल्हापूर येथील दसरा उत्सवाच्या धर्तीवर साताऱ्यातही शाही दसरा उत्सव साजरा होणार आहे. या शाही दसरा उत्सवात शासनाचाही सहभाग असणार आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होण्यासाठी सर्व विभागांनी आपापले योगदान द्यावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. या वर्षीपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्यातर्फे साजरा होणाऱ्या शाही दसरा सोहळ्यामध्ये शासनाचा सहभाग असणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादवे घुले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सुनील काटकर, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.
शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी सातारच्या प्रांताधिकाऱ्यांची सन्मवयक म्हणून नियुक्ती करावी, जलमंदिरात पालखीमध्ये भवानी तलवार पूजनावेळी पोलीस बॅन्ड पथकाने मानवंदना द्यावी, मिरवणुकीमध्ये घोडे, उंट यांचाही वापर करून त्यावर बसणाऱ्यांना मावळ्यांचा पोशाख द्यावा, पालखीसोबत समारंभाच्या पोषाखातील पोलीस पथक ठेवावे, शासनातर्फे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, अशी सूचना श्री. देसाई यांनी केल्या.
जलमंदिर ते शिवतीर्थ निघणार मिरवणूक
दसरा शाही मिरवणुकीला सायंकाळी 5.30 वाजता सुरुवात होईल. ही मिरवणूक जलमंदिर ते शिवतीर्थ अशी होईल. त्याचबरोबर शाही पोवाड्याचे आयोजन करावे. नगरपालिकेने राजपथ स्वच्छ करावा. तसेच शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करावी. मिरवणुकीच्या प्रारंभी पोलीस पायलट ठेवावे. या वर्षीचा शाही दसरा सर्वांच्या सहभागाने उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने जबाबदारी दिलेल्या विभागांनी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.





