सातारा – नंदा जाधव यांच्या नावाचे क्रीडा विद्यापीठ व्हावे ज्येष्ठ क्रीडा संघटक सुरेश साधले यांची अपेक्षा

सातारा – आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव यांची क्रीडा कारकीर्द नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी योग्य गौरव केला पाहिजे. नंदा जाधव यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने सातारा येथे क्रीडा विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ क्रीडा संघटक सुरेश साधले यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव यांच्या 25 व्या स्मृतिदिनी नंदा जाधव प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिर आणि आंतरराष्ट्रीय धावपटू प्राची देवकर हिला नंदा जाधव स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी साधले बोलत होते. प्राची देवकर ही स्पर्धेसाठी परदेशी गेल्याने तिच्यावतीने आई-वडिलांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पत्रकार राजेंद्र कामटे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत देशमुख यांनी आभार मानले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण जाधव, उपाध्यक्ष टी. आर. गारळे, इंदिराबाई जाधव, आनंदराव कणसे, आंतरराष्ट्रीय धावपटू सुलताना खान उर्फ स्नेहल राजपूत, गटविकास अधिकारी महेंद्र पाटील व मान्यवर उपस्थित होते बालाजी ब्लड बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या सहकार्याने झालेल्या रक्तदान शिबिरात 222 जणांनी रक्तदान केले. प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या 25 वर्षांत झालेल्या रक्तदान शिबिरांमध्ये तीन हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. 2000 पासून रक्तदाते रक्तदान करत आहेत, असे गारळे यांनी सांगितले.





