सातारा | झेडपीच्या शाळांमध्ये उद्या ‘शाळा प्रवेशोत्सव’

सातारा | शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ ची सुरुवात शनिवारी (दि. १५) होत असून जिल्हयातील शाळांचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होऊन शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी जिल्हा परिषदेच्या २६८२ शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा दिवसेदिवस उंचावत असून जिल्हा परिषद स्मार्ट स्कूलसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्येही विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यावर्षी शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम होणार आहे.
शाळा सुरु होण्याच्या पूर्व दिवशी शिक्षक, व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच इतर सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या घरी भेट देणार आहेत. पदयात्रा व शाळा परिसर स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता करुन शालेय परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे शबनम मुजावर यांनी सांगितले. शाळा सुरु होण्याच्या दिवशी प्रभातफेरीचे आयोजन होणार असून विदयार्थ्याचे फुले देऊन स्वागत होईल.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येईल. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या माजी सदस्य, पदाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यंचे स्वागत करण्याची विनंती केली जाणार आहेत. विधीमंडळ सदस्यांना जिल्हयातील एका शाळेत कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून निमंत्रण देण्यात आले आहे. शिक्षण विभागातील अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी किमान एका शाळेत उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजन योजनेतील जेवणात गोड पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धेत टिकण्यासाठी उपयुक्त असे शिक्षण देण्यात येत आहे. शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेऊन प्रगती साधावी.
– शबनम मुजावर (शिक्षणाधिकारी, प्राथमिक)





