Satara Sangli MLC Election: धैर्यशील कदम की अभयसिंह जगताप? विधान परिषदेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी?
Satara Sangli MLC Election: महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांच्यात थेट लढत; ९९ टक्के विक्रमी मतदानामुळे धाकधूक वाढली.

Satara Sangli MLC Election – विदान परिषदेच्या सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत तब्बल ९९ टक्के मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे. या निवडणुकीत महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यात प्रमुख लढत आहे. प्रतिष्ठेच्या या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशा राजकीय ताकदीची परीक्षा मानली जात आहे.
त्यामुळे दोन्ही बाजूंनी सर्व शक्ती पणाला लावण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी खासदार उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले सांगली जिल्ह्यातील नेतेमंडळी आणि इतर आमदारांसह प्रमुख नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यासाठी पक्षाचे नेते जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,काँग्रेसच विश्वजित कदम यांनी मैदानात उतरून वातावरण निर्मिती केली आहे.
अभयसिंह जगताप यांनी दोन्ही जिल्ह्यातील तालुक्यातालुक्यांत मोठ्या प्रमाणावर संपर्क साधून मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न केले. गेल्या काही वर्षांतील बदललेले राजकीय समीकरण महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान ठरत आहे. एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातमहाविकास आघाडीला मर्यादित राजकीय आधारावर लढावे लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महायुतीसोबत उभे राहत विरोधकांवर दबाव निर्माण केला आहे.
या निवडणुकीचा निकाल केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून सातारा–सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या राजकारणाशी जोडला गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरण, प्रलंबित विकास कामे, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि भविष्यातील प्रशासकीय पुनर्रचनेच्या प्रश्नांवर या मतदारसंघाचा प्रतिनिधी प्रभावी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे मतदारांनी केलेले विक्रमी मतदान ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील राजकीय दिशा ठरविणारे मानले जात आहे.
निवडणुकीचा निकाल सोमवारी(दि. २२) असून कोणाचा विजयाचा झेंडा फडकणार? महायुतीची संघटित ताकद आणि सत्तेची धार प्रभावी ठरणार की महाविकास आघाडीचा पारंपरिक मतदार कौल देणार? याचे उत्तर त्यादिवशी मिळणार असले तरी सध्या सातारा आणि सांगलीच्या राजकारणात या निवडणुकीचीच सर्वाधिक चर्चा रंगली आहे. विक्रमी मतदानामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, या प्रतिष्ठेच्या लढतीत प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे.





