उंब्रज : कराड उत्तरच्या जनतेने 25 वर्षात आपली क्षमता पाहिली असून कारखाना कुणी आणि कसा अडचणीत आणला, हे सभासद जाणून आहेत. सभासद आता फक्त मतदान करण्याची वाट बघत आहे. स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्रि परिवर्तन पॅनेल पाच ते सात हजारांच्या मतांनी विजयी होईल, असा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला. उंब्रज येथे स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्रि परिवर्तन पॅनेलची सांगता सभा झाली. यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज घोरपडे म्हणाले, पंचवीस वर्षे लोकांना झुलवत ठेवण्याचे काम झाले. साडेतीन महिन्यात हणबरवाडी-धनगरवाडी योजना मार्गस्थ करण्याचे आम्ही काम केले. कराड उत्तरमध्ये केलेले एक तरी काम लक्षात राहील असे दाखवावे, असे आव्हान विरोधकांना त्यांनी दिले. यावेळी संपतराव जाधव, सुरेश पाटील, वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, मोहनराव माने, निवासराव निकम, प्रकाश पाटील, शरद चव्हाण, महेशकुमार जाधव, सरपंच योगराज जाधव, आत्माराम जाधव, सुभाष पाटील, गोपीनाथ पाटील अनेक मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार घोरपडे म्हणाले, आम्ही स्वार्थासाठी कधी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला नाही. चव्हाण साहेबांच्या पुतळ्याभोवती साखरेची पोती लावून त्यांनी विटंबना केली. विधानसभेला आम्ही तुम्हाला शड्डू मारला होता. सहा तारखेला पुन्हा एक फूट गुलाल टाकून पुन्हा एकदा शड्डू मारणार आहे. आमदारकी गेल्यावरच साखर मोफत करण्याचे का सुचले, असा सवालही त्यांनी केला. इलेक्शन आले की उसाला दर देण्याची घोषणा करता. मात्र, साडेआठ हजार सभासद वारसांची नोंद आपण केली नाही. आपण कारखान्यावर कर्ज करून ठेवले ते फेडण्याची ताकद असल्याचेही ते म्हणाले. वसंतराव जगदाळे म्हणाले, सह्याद्री साखर कारखाना चालवण्यासाठी आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले पॅनेल सक्षम आहे. महेशकुमार जाधव म्हणाले, कारखान्यामार्फत पाणी पुरवठा संस्था चालवल्या जातात. त्यातील बर्याच संस्था बंद पडल्या. काही अत्यवस्थ आहेत. उंब्रजची उमेश्वर पाणी संस्था भाऊंच्यामुळे बंद पडली नाही. त्याची जबाबदारी माजी आमदारांनी घ्यायलाच पाहिजे. संस्थेच्या प्रत्येक वार्षिक सभेला चेअरमन, व्हाईस चेअरमन उपस्थित राहतात. मग, तुम्ही कशासाठी उपस्थित राहता. तसेच प्रत्येक संस्थेकडून वार्षिक तपासणी फी कशासाठी आकारता असा सवाल महेश कुमार जाधव यांनी केला. यावेळी अधिकराव शिंदे, राहुल यादव, बाजीराव भोसले, जगन्नाथ जाधव, वैभव साळुंखे, सुभाष पाटील, सचिन शिंदे, विकास आण्णा गायकवाड, गोपीनाथ पाटील, हणमंत साबळे, सचिन जाधव, गणेश जाधव, नवनाथ पाटील, नंदकुमार जगदाळे, संतोष वेताळ, वासुदेव माने, सुरेश पाटील, वसंतराव जगदाळे, विवेक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. उसाला चांगला दर देण्याची आमची क्षमता पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ आपण या संस्थेचे चेअरमन आहात.आज कारखाना अडचणीत आहे म्हणता. मग हा कारखाना तुम्हीच अडचणीत आणला ना? कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याची, कामगारांना न्याय देण्याची तसेच सभासदांचा ऊस वेळेत नेऊन त्याला चांगला दर देण्याची क्षमता आमच्यात आहे, असेही आमदार घोरपडे म्हणाले.