Satara RTO: सातारा आरटीओचा मोठा ॲक्शन प्लॅन! सोमवारपासून रिक्षाचालकांची मनमानी थांबणार?
Satara RTO: एसटी बसस्थानक, मोती चौक यांसह शहरातील प्रमुख चौकांमध्ये तैनात राहणार विशेष पथक; नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन.

Satara RTO – शहरातील रिक्षाचालकांकडून मीटरप्रमाणे भाडे न आकारता मनमानी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या तक्रारींची दखल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचा इशारा आरटीओ अधिकार्यांनी दिला असून, सातार्यात सोमवार, दि. 22 पासून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
शहरातील रिक्षाचालक मीटरचा वापर टाळत आहेत. अनेक रिक्षाचालक गणवेश घालत नाहीत. रात्री नियमांपेक्षा अधिक भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी आहेत. शासनाने निश्चित केलेल्या दरपत्रकानुसारच रिक्षाभाडे आकारणे बंधनकारक आहे. प्रत्येक रिक्षामध्ये अधिकृत दरपत्रक उपलब्ध असणे आवश्यक असून, चालकांनी मीटरचा वापर करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.
रिक्षा ही सर्वसामान्यांसाठी दैनंदिन प्रवासाची महत्त्वाची सुविधा असल्याने, प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असल्याने, येत्या सोमवारपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जादा भाडे आकारणी, मीटर न वापरणे किंवा गैरवर्तनाच्या तक्रारी पोलिसांकडे अथवा आरटीओ कार्यालयाकडे नोंदवणे आवश्यक आहे.
शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक, मोती चौक व वर्दळीच्या इतर ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांनी दिली. शासनाने निर्धारित केलेल्या दरपत्रकानुसारच रिक्षाचालकांनी भाडे आकारणे बंधनकारक आहे. मीटरचा वापर न करणे, जादा भाडे आकारणे अथवा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रिक्षाचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. सोमवार, दि. 22 पासून शहरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली.





