पुसेगाव – शालेय जीवनात विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीमत्वे ऐकल्यास, अनुभवल्यास जीवनास कलाटणी मिळते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते. याकरता प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत साळुंखे यांच्यासारख्या संशोधक व्यक्तिमत्वाची ओळख व त्यांना भेटण्याचा योग संस्थेने घडवून आणला. समाजातील आदर्श व्यक्तिमत्वे साऱ्यांकरता कायम प्रेरणादायी ठरत असतात, असे मत श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केले. संस्थेच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात डॉ. जाधव बोलत होते. संस्थेच्यावतीने यावर्षीपासून फाऊंडेशन विषय सुरु करण्यात येत असून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून दिले जात आहे. संस्था गरीब, गरजू, हुशार विदयार्थ्याना नेहमीच मदत करत आली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा आजचा सत्कार त्यांना भविष्याकरता दिशादर्शक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. चंद्रकांत साळुंखे म्हणाले, “विद्यार्थ्यांकरता शालेय जीवनातील प्रोत्साहन व बक्षीसे खूप महत्त्वाची ठरतात. यशस्वी होण्याकरता आई- वडिलांचे संस्कार व गुरुजनांची शिकवण कायम उपयुक्त ठरते. त्यामुळे त्यांना विसरू नका. जगाच्या बाजारपेठेत तुमची विद्वत्ता तपासली जाते. विद्यार्थ्यांनी निसर्गप्रेम वाढवावे, संशोधन वृत्ती वाढवावी, स्वतःचे मार्ग स्वतः निवडावेत, शालेय वयापासूनच आपले आदर्श ठरवावेत. तरच भविष्यातील जीवन सुखकर व यशस्वी बनेल.”उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी आधुनिक शिक्षणाचे महत्त्व विशद केले. प्राचार्य डी .एन. गोफणे यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक आर .एन. जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. जे. बी. जाधव यांनी तसेच अनुजा उमेश जाधव हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुभाष आगाशे, विश्वनाथराव जाधव, एस. आर. पाटील, जयंतराव जाधव, के. डी. पवार, डी. पी. शिंदे, दगडूदादा शिंदे, सुधाकर माने, बाळासाहेब खटावकर, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब गाढवे, विविध शाखांचे मुख्याध्यापक, पालक, शिक्षक, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मोहनराव गुरव, सौ. एम.एस.चव्हाण, स्वाती बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. डी .पी. शिंदे यांनी आभार मानले.