सातारा – बिऊरच्या शेतकऱ्यांसाठी आजपासून मोरणेचे आवर्तन

शिराळा – मोरणा धरण व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी रविवारी 29 ऑक्टोबरपासून पाण्याचे आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली. याबाबतची माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील बिऊर ता. शिराळा येथील मोरणा नदी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन शेतीला पाणी मिळावे
यासाठी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांच्या पाण्याबाबतच्या अडचणी लक्षात घेऊन शिवाजीराव नाईक यांनी पाटबंधारे विभागाच्या सांगली व कोल्हापूर येथील अनुक्रमे कार्यकारी व अधीक्षक अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. अधिकाऱ्यांना शेतीच्या सध्य परिस्थितीची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या त्यानुसार मोरणेचे पाणी आवर्तन रविवार, 29 ऑक्टोबरपासून सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुखदेव पाटील, शामराव पाटील, उत्तम पाटील, जयदीप पाटील, मारुती पाटील, महादेव पाटील, अरुण मांगलेकर, दिनकर पाटील, आनंदा खुजे, अनिल पाटील, रमेश पाटील, श्रीकांत पाटील, अनिल शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.




