फलटण : आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम अतिशय कासवगतीने सुरू असून यामधील धर्मपुरी ते लोणंद या टप्प्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून धर्मपुरी ते पंढरपूर यामधील काम पूर्ण झाले. यामध्ये सुद्धा काही ठिकाणी काम अर्धवट असताना राजुरी, ता फलटण येथील टोलनाका मात्र, दि. २२ पासून सुरू करण्यात आला आहे. यामुळे पालखी मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भक्तीचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा हा पालखी मार्ग केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त प्रकल्प असून हा मार्ग केव्हाच पूर्ण होणे अपेक्षित होते यातील टप्पा क्रमांक २ धर्मपुरी ते लोणंद याची मुदत ही सप्टेंबर २०२३ ला संपलेली असून अजूनही या मार्गातील काम अपूर्ण आहे. यामध्ये फलटण शहराला वळसा घालून जाणारा बाह्यरस्ता हा आठ किलोमीटर लांबीचा असून यामध्ये नीरा उजवा कालव्या वरील दोन पूल फलटण बारामती मार्गावरील उड्डाणपूल फलटण खुंटे मार्गावरील उड्डाणपूल तसेच बाणगंगा नदीवरील पूल व ओढ्यांवरील पूल अपूर्ण असून कामाची गती पहाता अजून एक वर्ष ही कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. त्याच प्रमाणे सुरवडी व तरडगाव येथील उड्डाणपूल यांचेही काम अपूर्ण असताना राजुरी टोलनाका सुरू केल्याने वैष्णव भक्तांत तीव्र नाराजी असून कामे पूर्ण होईपर्यंत टोलनाका सुरू न करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली असून काम पूर्ण होईपर्यंत टोलनाका सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी वैष्णवभक्तांनी केली आहे ० ते २० किलोमीटरसाठी विशेष पास या ठिकाणी ० ते २० किलोमीटर अंतरावरील प्रवाशांसाठी मासिक पासची सुविधा उपलब्ध असली तरी प्रवाशांना आधारकार्ड वरील पत्ता बघून विना मोबदला प्रवास करता यावा अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे. पालखी महामार्गाच्या काम वेळेत व गुणवत्तापूर्ण पणे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांचे असून याबाबत त्यांनी पालखी मार्गास भेट दिल्याचे दिसले नाही. या उलट या पूर्वीचे प्रांताधिकारी सतत या कामाचा पाठपुरावा करत होते. त्यांची बदली झाल्यावर कामाची स्थिती जवळजवळ जैसे थे अशीच आहे