Satara : ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा 28 जूनला फलटण मुक्कामी

फलटण : संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा यंदा आषाढी वारीसाठी 19 जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या वारीत पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात तब्बल चार दिवस मुक्काम असेल. हा सोहळा दि. 26 जून रोजी माउलींच्या पादुकांच्या नीरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून, त्या दिवशी लोणंद येथे एक दिवसाचा मुक्काम असेल. दि. 27 जून रोजी सोहळा पहिल्या उभ्या रिंगणानंतर तरडगाव येथे आणि दि. 28 जूनला फलटण येथे मुक्कामी विसवणार आहे. सोहळ्याचा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम दि. 29 जून रोजी बरड, ता. फलटण येथे होईल. पुढे पालखी सोहळा दि. 30 जूनला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.
आळंदी येथे पालखीची दि. 19 जून रोजी नित्याची गुरुवारची मंदिर प्रदक्षिणा होईल. पालखी सोहळा रात्री 8 नंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाच्या वाटचालीत सातारा जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे प्रत्येकी एक मुक्काम असेल. शुक्रवारी (दि. 20) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन, पुणे येथे दि. 20 व 21 अशा दोन दिवसांच्या मुक्कामी राहील.
सासवड येथे दि. 22, 23 जून, जेजुरी येथे दि. 24) आणि वाल्हे येथे दि. 25 रोजी मुक्काम होईल.
माउलींच्या पादुकांना नीरास्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील प्रवेश करून पालखी लोणंद येथे दि. 26 रोजी मुक्कामी पोहोचेल. तरडगाव (दि. 27), फलटण (दि. 28), बरड (दि. 29) आणि नातेपुते (दि. 30) येथील मुक्कामानंतर पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल. तेथून सोहळा माळशिरस येथे 1 जुलैला आण पुढे वेळापूर येथे दि. 2 जुलैला मुक्कामी जाईल.
संत सोपानदेवांच्या भेटीनंतर माउलींचा सोहळा भंडीशेगाव येथे दि. 3 जुलैला मुक्कामी असेल. त्यानंतर सोहळा वाखरी येथे दि. 4 रोजी मुक्काम करून, 5 जुलैला पंढरपूरमध्ये प्रवेश करेल. आषाढी एकादशी 6 जुलैला आहे.
अशी असेल सोहळ्याची वाटचाल – 19 जूनला आळंदीतून प्रस्थान, दि. 20 आळंदी ते पुणे 29 किमी, दि. 21 पुणे मुक्काम, दि. 22 पुणे ते सासवड 32 किमी, दि. 23 सासवड मुक्काम, दि. 24 सासवड ते जेजुरी 16 किमी, दि. 25 जेजुरी ते वाल्हे 12 किमी. सातारा जिल्हा प्रवेश – दि. 26 वाल्हे ते लोणंद 20 किमी, दि. 27 लोणंद ते तरडगाव 8 किमी, दि. 28 तरडगाव ते फलटण 21 किमी, दि. 29 फलटण ते बरड 18 किमी, दि. 30 बरड ते नातेपुते 21 किमी.
सोलापूर जिल्ह्यात प्रवेश – दि. 1 जुलै नातेपुते ते माळशिरस 18 किमी, दि. 2 माळशिरस ते वेळापूर 19 किमी, दि. 3 वेळापूर ते भंडीशेगाव 21 किमी, दि. 4 भंडीशेगाव ते वाखरी 10 किमी, दि. 5 वाखरी ते पंढरपूर 5 किमी, दि. 6 देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशीनंतर पौर्णिमेपर्यंत (दि. 10 जुलै) सोहळ्याचा मुक्काम पंढरपूर येथे असेल. दि. 10 जुलैला गोपाळकाला झाल्यावर माउलींच्या सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होईल.





