प्रभात वृत्तसेवा भुईंज – सहकार क्षेत्रातील मानबिंदू अशी किसनवीर साखर कारखान्याची ओळख जिल्ह्यात आहे. शेतकरी सभासदांच्या उसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे जीवनमान उंचवावे, हे किसन वीर आबा व लक्ष्मणरावतात्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न किसनवीर कारखाना व्यवस्थापनाकडून प्रामाणिकपणे सुरू आहे. सर्वांच्या सहकार्याने गतवर्षीचा हंगाम यशस्वी झाला. शेतकरी आणि कारखान्याच्या कामगारांच्या उन्नतीसाठी हा गळीत हंगाम ही पूर्ण ताकदीनिशी यशस्वी करूया. असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील यांनी केले.किसनवीर साखर कारखान्याच्या सन 2025-26 च्या गाळप हंगामाचा शुभारंभ संचालक रामदास गाढवे, सौ. जयश्री गाढवे आणि संजय कांबळे व सौ. शर्मिला कांबळे यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून, उत्साहात झाला. त्यावेळी मंत्री मकरंद पाटील बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री मकरंद पाटील म्हणाले, कारखान्याचे खरे मालक सभासद शेतकरी आहेत. आम्ही फक्त कारखाना सुस्थितीत आणण्याचे काम करणार आहोत. हा कारखाना पुन्हा नव्या जोमाने उभा आणि सुरू राहणे गरजेचे आहे. प्रमोद शिंदे म्हणाले, यंदाच्या गळीत हंगामासाठी किसनवीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने सज्ज असून, तोडणी यंत्रणाही पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. या हंगामात दोन्ही कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप होणे गरजेचे आहे. तसे झाले तरच दोन्ही कारखाने कर्जमुक्त होणार असून, येत्या काळामध्ये किसनवीरचा ऊसदर जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत सर्वोत्तम राहणार आहे. त्यामुळे सभासदांनी निश्चिंत राहावे. संचालक संदीप चव्हाण म्हणाले, कारखान्याचे मागील गाळप आपण सर्वांनी मिळून यशस्वी केले. कारखाना सुरळीत चालला, तर आगामी काळात ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व स्थानिक जनतेचे जीवनमान नक्की उंचावेल. कामगारांचे प्रलंबित असलेले काही प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करत आहे. शेजारील कारखान्याच्या तुलनेत आपला कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास अजून थोडा वेळ लागणार आहे. कारखानदारीतील स्पर्धा मोठी आहे. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्ते सक्षम.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी माझे कार्यकर्ते सक्षम असल्याने, मला प्रचाराची कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कार्यकर्त्यांनी मैदानात उतरून, ही लढाई लढायची आहे आणि विजयाचा गुलाल मला लावायचा आहे. माझ्यावर बुलडाणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी स्वत:ला मकरंद पाटील समजून, मला विजय संपादन मिळवून द्यावा, अशी अपेक्षा मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केली.