Satara News : वृक्षरोपण अन् झाडांची सोयरीकही, गच्चीवरची परसबागेचा उपक्रम

सातारा : श्रावण महिन्याचे स्वागत करण्यापूर्वी सातारकर आखाडी साजरी करण्यात व्यस्त असतात. मांसाहाराचा बेत हा आखाडीचा मुख्य उद्देश. मात्र, हरित सातारा गच्चीवरची परसबाग ग्रुपच्यावतीने पर्यावरणीय संवेदनशीलता जपत आखाडी साजरी केली. वृक्षरोपण आणि झाडांची सोयरीक करून निसर्गप्रेमींनी अनोखी आखाडी अनुभवली.
कोरेगाव तालुक्यातील मोहितेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या आखाडी कार्यक्रमाची सुरूवात रोपांच्या सोयरिकीने झाली. आखाडीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने रोप आणणे सक्तीचे होते. त्यामुळे सर्व सदस्यांनी आपल्याकडील रोपे शेतात लावली. यावेळी कुंडीतील झाडांना किडीपासून कसे वाचवावे याविषयी प्रगतशील शेतकरी योगेश जगदाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रुपच्या सदस्या अॅड. जान्हवी घाडगे, अॅड. धीरज घाडगे, शशिकला घाडगे, मौसमी सावंत, डॉ. अपर्णा भाकरे, सिंधू सरगर, डॉ. खुशी जोशी, प्रविणा फडतरे, गौतम फिरोदिया, इदा लोबो फिरोदिया, विक्रांत मेहेंदळे, डॉ. श्रीराम भाकरे, योगेश जगदाळे, मयुर दोषी, मल्हार घाडगे, साईराज पवार, रोशनी जोशी, चंद्रसेन फडतरे आदी सदस्य उपस्थित होते.
माझी जागा तुमचे रोप
सातार्यातील प्रतिथयश कायदेतज्ज्ञ अॅड. धीरज घाडगे यांची कोरेगाव तालुक्यातील मोहितेवाडी येथे शेतजमीन आहे. यातील 1 एकर जागा त्यांनी गच्चीवरची परस बाग या ग्रुपच्या सदस्यांसाठी राखून ठेवली आहे. ज्या सदस्यांना जागे अभावी शेतीचा आनंद घेता येत नाही, अशा सदस्यांनी या जागेत बाग फुलवावी आणि त्याचे उत्पन्नही घ्यावे असे त्यांनी जाहीर केले आहे.
अशी होते झाडांची सोयरीक
विषमुक्त भाजी पिकविण्याची मोहिम सातारकरांनी काही महिन्यांपूर्वी हाती घेतली. परसबाग तज्ज्ञ प्रिया भिडे यांच्या मार्गदर्शनानंतर या ग्रुपची स्थापना करण्यात आली. त्यानंतर गृह भेटीच्या निमित्ताने परस्परांकडे जाताना झाडांची देवाण घेवाण होऊ लागली. याला ग्रुपचे सदस्य झाडांची सोयरीक म्हणून संबोधतात.
या झाडांचे झाले रोपण
पांंढरे जांभूळ, ब्रह्मकमळ, आबोली, मोगरा, जास्वंद, बदाम, आंबा, मेक्सिकन पिटूनिया, तुळस, गावरान जांभूळ, स्नेक प्लांट, स्टार फ्रुट या झाडांचे रोपण करण्यात आले.
हरित साताराच्या गच्चीवरची परसबाग ग्रुपच्या माध्यमातून विषमुक्त भाजी पिकविण्याचा उद्देश स्तुत्य आहे. यातील अनेकांना बागकामेची आवड आहे पण जागे अभावी ज्यांना या आवडीला मुरड घालावी लागते त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. आखाडी निमित्त आलेल्या सदस्यांनी शेकडो झाडांचे रोपण केले आहे.
– अॅड. धीरज घाडगे, मोहितेवाडी





