वाई : वाईच्या गंगापुरी परिसरातील सृष्टी अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट्सना लक्ष्य केले. कुलूप तोडून आत प्रवेश करत त्यांनी एका फ्लॅटमधून १३ लाख रुपये किंमतीचे १९ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख, तर दुसऱ्या फ्लॅटमधून १० हजार रुपये रोख असा एकूण साडेचौदा लाखांचा ऐवज लंपास केला. सृष्टी अपार्टमेंटमधील सदनिका क्र. ७ मध्ये राहणारे शिक्षक विशाल धनाजी जरंडे आणि त्यांच्या पत्नी विनिता सकाळी ९ वाजता शाळेसाठी घराला कुलूप लावून गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातून सोने आणि रोख रक्कम चोरली. याचवेळी समोरच्या दुसऱ्या फ्लॅटमधील १० हजार रुपयेही चोरट्यांनी लुटले. या घटनेने वाई शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र शहाणे आणि डीबी पथकाचे प्रमुख फौजदार सुधीर वाळुंज यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. विशाल जरंडे (रा. आसरे, ता. वाई, सध्या रा. सृष्टी अपार्टमेंट, गंगापुरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून, फौजदार वाळुंज तपास करत आहेत.