Satara News : धक्कादायक ! सुपारी देऊन पतीची हत्या; पत्नीसह मेहुण्याला अटक
कराड शहरातील (Satara News) बहुउद्देशीय हॉलसमोरील रस्त्यावर शनिवारी पहाटे एका शासकीय कर्मचाऱ्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. संबंधिताचा अपघातात मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येत होते.

Satara News : कराड शहरातील (Satara News) बहुउद्देशीय हॉलसमोरील रस्त्यावर शनिवारी पहाटे एका शासकीय कर्मचाऱ्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. संबंधिताचा अपघातात मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येत होते. मात्र, पोलिसांनी सखोल तपास केला असता पत्नीनेच भावाच्या मदतीने संबंधिताचा कारखाली चिरडून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुपारी देऊन हा खून करण्यात आला असून या गुन्ह्यात प्रथमदर्शनी चौघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यापैकी (Satara News) पत्नी आणि तिच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४, मूळ रा. मनव, ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. लक्ष्मण मंडले हे ठाणे जिल्ह्यात जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बहुउद्देशीय हॉलसमोरील रस्त्यावर शनिवारी पहाटे ५.५३ वाजता एका पादचाऱ्याला चारचाकी वाहनाने उडवल्याची माहिती कराड शहर पोलिसांच्या बीट मार्शल पथकाला मिळाली. पोलीस घटनास्थळी (Satara News) दाखल झाले असता लक्ष्मण मंडले गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने मृत व्यक्ती आपले पती असल्याचे सांगितले. मात्र, पहाटेच्या वेळी तिची उपस्थिती आणि दिलेल्या माहितीतील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली.
घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता धक्कादायक बाब समोर आली. लक्ष्मण मंडले हे रस्त्याने चालत असताना एका कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहनचालकाने गाडी मागे-पुढे घेत त्यांना चिरडल्याचे आणि त्यांच्या जवळील साहित्य घेऊन पसार झाल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. एवढ्यावरच न थांबता काही वेळानंतर पुन्हा घटनास्थळी परत येऊन जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर वाहन घालण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले आणि त्यांची पत्नी सुरेखा मंडले यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. याच पार्श्वभूमीवर सुरेखा मंडले आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांनी सुमारे महिनाभरापूर्वी मंडले यांचा काटा काढण्याचा कट रचला. ओळखीच्या व्यक्तींमार्फत सुपारी देऊन लक्ष्मण मंडले यांचे लोकेशन पुरविण्यात आल्याची बाब प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय ३६, रा. मनव, ता. कराड) आणि मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (वय ४०, रा. सुरुल पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रत्यक्ष सुपारी घेऊन खून करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू असून त्यासाठी कराड शहर पोलिसांची तीन आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
… या पोलीस पथकाने केला तपास
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, अशोक भापकर, निलेश तारु, श्रद्धा आंबले, जयश्री वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दीपक बागवे, कृष्णा डिसले तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवून प्रकरणाचा उलगडा केला.





