Satara News : मांढरदेव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

मांढरदेव : वाई तालुक्यातील मांढरदेव येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा झाला. यानिमित्त गावातील युवकांनी पनवेल येथील किल्ले विसापूर येथून आणलेल्या शिवज्योतीची गावातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठी रंगत आणली होती. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव गावात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या अनेक पिढ्यांपासून अविरत सुरू आहे.
यावर्षी शिवजयंती उत्सवासाठी मांढरदेव येथील युवकांनी किल्ले विसापूर पनवेल येथून शिवज्योत आणली होती. त्यासाठी गावातील 70 ते 80 तरुण ज्योत आणण्यासाठी किल्ले विसापूर या ठिकाणी गेले होते. युवकांनी विसापूर गडावरील शिव मंदिरामध्ये दर्शन घेऊन तेथेच ज्योतीचे प्रज्वलन केले.त्यानंतर प्रत्येक युवकाने आपला सहभाग देत तेथून मांढरदेवपर्यंत 175 किलोमीटर ज्योत धावत घेऊन आले. या सर्व प्रवासामध्ये त्यांना अनेक शिवभक्तांनी त्यांचे स्वागत करत आवश्यक साहित्य प्रदान केले.
भोरमध्ये शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर तेथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून या युवकांनी मांढरदेवकडे प्रस्थान केले. घाट रस्त्याने सकाळी 11 वाजता या सर्व युवकांचे मांढरदेव गावात आगमन झाले. शिवज्योत गावातील महिला व मुलींच्या हातात देण्यात आली. ती ज्योत घेऊन या महिला काळुबाई देवीच्या मंदिरात गेल्या. ज्योत देवीला भेटवून तिची गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंती उत्सवानिमित्त युवकांकडून सर्व ग्रामस्थांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर शाळेतील लहान मुलांचा पारंपारिक संगीतमय गाण्याचा व नृत्याचा कार्यक्रम झाला. त्याला शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





