Satara News: मतपेट्यांच्या गोदामावर शिंदे गटाचा वॉच! नीलेश मोरेंची रिक्षा स्वारी; केली पाहणी

प्रभात वृत्तसेवा
सातारा – सातारा नगरपालिकेची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. मतदारांचे भविष्य मतपेटीत बंद झाल्यावर औद्योगिक वसाहतीतील शासकीय गोदामात मतपेट्या ठेवण्यात आल्या. त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा वॉच असून शिवसेनेचे उमेदवार नीलेश मोरे यांनी गुरुवारी रिक्षा स्वारी करत गोदामाची पाहणी केली.
सातारा नगरपालिकेची मतदान प्रक्रिया दि. 2 डिसेंबर रोजी पूर्ण झाली. दि. 3 डिसेंबर रोजीची मतमोजणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. ती प्रक्रिया रविवार दि. 21 रोजी होणार आहे. नगरपालिकेतील सर्व उमेदवारांचे भविष्य बंद असलेल्या मतपेट्या एमआयडीसीतील शासकीय गोदामात ठेवण्यात आल्या.
त्याला पोलिसांसह सीसीटीव्ही व शासकीय अधिकाऱ्यांचा खडा पहारा आहे. यासह सर्व पक्ष व अपक्ष उमेदवारांचीही नजर आहे. असे असताना सातारा शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्र. 5 चे उमेदवार व सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी गुरुवारी रिक्षातून स्वारी करत गोदामाची पाहणी केली. याठिकाणी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.





