Satara News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शंभूराज देसाईंनी सहकुटुंब घेतली भेट

कोयनानगर : राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. मुंबईतील ‘मेघदूत’ हे शासकीय निवासस्थान त्यांच्या ताब्यात देण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल देसाई कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मंत्री शंभूराज देसाई रविवारी ‘मेघदूत’ या निवासस्थानी सहकुटुंब वास्तव्याला गेले.
याच मेघदूत निवासस्थानी त्यांचे आजोबा लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांनी वर्षानुवर्षे वास्तव्य केलं होतं, त्याच घरात विजयादेवी देसाई यांचा गृहप्रवेश झाला आणि याच घरात शंभूराज देसाई यांचा जन्मही झाला. त्यांच्या बालपणाच्या आठवणी, खेळ, शिक्षणाचा सुरुवातीचा काळ सगळं काही याच वास्तूशी जोडलेलं आहे. पंचावन्न वर्षांनी पुन्हा एकदा हेच घर मिळाल्याने देसाई कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेघदूत’ निवासस्थान देसाई यांच्याकडे वर्ग करून देण्यासाठी सहकार्य केलं, त्याविषयी देसाई आणि कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आभारपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली. या भेटीत कै. बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा, जुन्या आठवणींचा आणि त्यांच्या आठवणींनी भारलेल्या ‘मेघदूत’च्या इतिहासाचा मोकळेपणाने चर्चा करण्यात आली. या भेटीला मैत्रीचा, सन्मानाचा आणि परंपरेचा भावनिक स्पर्श होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देसाई कुटुंबाचे अभिनंदन करुन नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, अस्मितादेवी देसाई आ जयराज देसाई उपस्थित होते.





