satara news : शाळेचे वातावरण हे मुलांना आयुष्यभर प्रेरक ठरते; पाेलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे

वाई – मुलांची शिकण्याची प्रक्रिया ही सहज होत असते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील सर्व उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असतात. शाळेचे वातावरण हे मुलांना आयुष्यभर प्रेरक ठरते म्हणून ते जपायला हवे, असे प्रतिपादन पाेलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले.
येथील ब्लॉसम स्कूलच्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाेलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे ,सचिव अमोल चौगुले, संस्था विश्वस्त सौ. मनीषा शिंदे, ओमकार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शालान्त तसेच विविध स्पर्धांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
शिवाजी शिंदे म्हणाले, शिक्षण म्हणजे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे व त्यांच्या सूप्त गुणांचे संवर्धन करणे. या संवर्धन केलेल्या गुणांना व्यासपीठ देण्यासाठीच ब्लॉसम स्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचे आयाेजन केले जाते. या मंचावर काम करणारे विद्यार्थी शिक्षणाबराेबरच कला क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवितील.
स्नेहसंमेलनाची यावर्षीची संकल्पना कलाविष्कार ही होती. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी, विविध भाषिक, प्रादेशिक विभिन्नता दर्शवणारी नृत्यगीते सादर केली. या कार्यक्रमांमध्ये थीम डान्स या संकल्पने अंतर्गत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ थीम साँग द्वारे स्वतःचे विस्मरण अणि भगवंताचे स्मरण हेच खरे भक्तीचे रहस्य हा संदेश दिला. महाराष्ट्राची लोकधारा द्वारे सांस्कृतिक लोकपरंपरा साजरी करण्यात आली. संगीत, नृत्य आणि कलेद्वारे, राज्याचा समृद्ध वारसा आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक अभिव्यक्ती ने प्रेक्षकांना मोहित केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण रामायण थीम सॉंग हे होते. मुलांनी या नाटिकेद्वारे रामायण कथापट नृत्य व अभिनय याद्वारे सादर केला. रामायण सर्वांना चांगले कर्म करण्याचे आणि नेहमी इतरांना मदत करण्याचे महत्त्व शिकवते. आपण नेहमी चांगल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे कारण शेवटी चांगल्याचाच विजय होतो आणि वाईटाचा पराभव होतो.
आपल्याला प्रभु श्रीरामांच्या स्वभावाची प्रेरणा मिळू शकते. अनेक संकटानंतरही रामाने शेवटपर्यंत आपला चांगला स्वभाव सोडला नाही हा संदेश प्रतीत झाला. रामायण कथापट सादरीकरण झाल्यावर सभागृहामध्ये जय श्री च्या घाेषणांनी सर्व वातावरण रामायण मय झाले हाेते. सर्व उपस्थित पाहुणे, पालक व विद्यार्थ्यांकडून सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
मुख्याध्यापिका सौ. सारिका सपकाळ यांनी अहवाल सादरीकरण केले. सौ. मानसी घाडगे, विद्यार्थीनी प्रचिती देशमुख, राधिका मुळे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका सौ सारिका सपकाळ, कॉर्डिनेटर सौ. प्रीती फडके, सौ. मानसी घाडगे, सौ कविता पाटील यांनी संमेलनासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पाचगणी येथील भारत पुरोहित, राजेंद्र पार्टे, किरण पवार, मिस आलिया खान, सौ संगीता पाटील, सौ प्रेरणा भगत, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





