satara news : साताऱ्याचा नगरसेवक बिले काढणारा नसावा… सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची टोलेबाजी

satara news: आपल्याला शहराचा सिंगापूर करायचा नाही. मात्र, जो आहे तो सातारा अधिक चांगला करुया. साताऱ्याचा नगरसेवक शहराच्या प्रश्नांचा आवाका असणारा असावा, स्वतःच्या प्रभागापुरता विचार करणारा नसावा, केवळ नगरपालिकेत येऊन बिले काढणारे नगरसेवक काय कामाचे, अशी सूचक टोलेबाजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
सातारा- लोणंद व लोणंद ते शिरवळ रस्त्यांच्या कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीनंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक प्रश्नांवर ते अत्यंत सूचकपणे व्यक्त झाले. परखड भूमिका मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘अनेक जण वॉर्डात गटाराची कामे कशासाठी करतात हे सर्वांना माहीत आहे. माझी गल्ली माझा वार्ड असा संकुचित विचार करणारे उमेदवार नको आहेत. नगरसेवकपदाचा उमेदवार नगरपालिकेत येऊन बिले काढणारा नसावा, त्याला संपूर्ण सातारा शहराच्या प्रश्नांची जाण असली पाहिजे.’’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता लागावयास अद्याप वेळ आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. संधी कोणाला द्यायची हे ठरवण्याचे बाकी आहे. तसेच लढत कशी करायची यासंदर्भातही पक्षश्रेष्ठींच्या समवेत बैठक घेऊनच सर्व गोष्टी ठरवल्या जातील. साताऱ्याचे नगरसेवक हे चांगल्या पद्धतीने काम करणारे असावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारकडून निधी देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला भरभरून निधी देत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे साताऱ्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्याची आपली मानसिकता हवी. साताऱ्याचा सिंगापूर करायची आवश्यकता नाही. सातारा चांगला सुसज्ज असा करुया, से त्यांनी सांगितले. आगामी काळात साताऱ्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. त्यादृष्टीने सातारा शहरामध्ये प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक सिटी बस सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे स्टेशन, शाहूपुरी, बोगदा या भागांतून या बसेस सुरु करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





