Satara News : भूकंपग्रस्त दाखल्याच्या आधारे पाटण तालुक्यातील युवकांना भरतीत संधी

कोयनानगर : भूकंपग्रस्त दाखल्यांच्या आधारे पाटण तालुक्यातील २० युवक- युवतींनी महावितरणमध्ये विद्युत सहायक पदाच्या भरतीत यश मिळवले असून केवळ कोयना विभागातूनच १२ जणांची निवड झाली आहे. 1967 मधील भूकंपानंतर पाटण तालुका भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून घोषित झाला. त्यानंतर अनेक वर्षे या भागातील नागरिकांना शासकीय योजनांमध्ये भूकंपग्रस्त दाखल्याच्या आधारे विशेष सवलती मिळत होत्या.
मात्र, 2004 मध्ये शासनाने अचानकपणे हे दाखले देणे बंद केले. यामुळे हजारो युवक-युवती शासकीय नोकरी आणि इतर सवलतींपासून वंचित राहू लागले. शंभूराज देसाई यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत भूकंपग्रस्त दाखल्याचे वितरण पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांनंतर दाखल्यांचे वितरण पुन्हा सुरू झाले.
पुढे 2023-24 मध्ये शंभूराज देसाई पालकमंत्री पदावर कार्यरत असताना त्यांनी दाखला केवळ वारसदारांपुरता न मर्यादित करता तो खापर पणतूपर्यंत लागू व्हावा, यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केले. यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश काढून दाखल्याचा व्याप्तीवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. याचेच फलित म्हणजे नुकत्याच झालेल्या महावितरणच्या पदभरतीत पाटण तालुक्यातील 20 युवक-युवतींनी यश मिळवले.





