Satara News : मेणवली येथील दरोड्यामध्ये साडेचार लाखांचा ऐवज लंपास

वाई : मेणवली (ता. वाई) येथे काल रात्री १२. ४५ च्या सुमारास दहा ते बारा जणांनी भूषण शरद कोचळे यांच्या घराचा दरवाजा तोडून सशस्त्र दरोडा टाकून घरातील ४ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने लुटले. याबाबत वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यानी आणखीही काही घरे फोडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. रात्री घरात सगळे झोपले असताना अचानक चोरट्यांनी दरवाजा फोडून घरात प्रवेश करत धारदार शस्त्रांचा धाक दाखवत घरातील मौल्यवान वस्तू लुटल्या. त्यामुळे मेणवलीसह वाईच्या पश्चिम भागात खळबळ माजली आहे.
या घटनेची माहिती वाई पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलावल्याचे समजते. या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात सुरू होते. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस तपास करीत आहेत.





