satara news: तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही, विजय वडेट्टीवार: महायुती सरकार पोलिसांना पाठीशी घालत आहे

satara news : जेव्हा रक्षकच बनतो भक्षक असा संदर्भ देत विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना तिने हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात उल्लेख आहे, पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केला, तर प्रशांत बनकर याने तिला सतत मानसिक त्रास दिला. परंतु पोलिसांचे काम रक्षण करण्याचे आहे. अशावेळी जर तेच महिला डॉक्टरचे शोषण करत असतील, तर न्याय मिळणार कसा? या मुलीने याआधी तक्रार करूनही कारवाई का झाली नाही? कारण महायुती सरकार वारंवार पोलिसांना पाठीशी घालत आहे, त्यातूनच पोलीस अत्याचार वाढत आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकरणी नुसते चौकशीचे आदेश देऊन उपयोग नाही. अशा पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे. जर नाही केले तर तपासावर ते दबाव टाकू शकतात. कारण याआधी तक्रार करूनही त्याची दखल का घेण्यात आली? याआधी कोणी दुर्लक्ष केले? या पोलिसांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. कारण पोलिसांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हणाले, पीएसआय गोपाल बदने याने अत्याचार केल्याचं, तर प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचे हातावर लिहून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक घडली आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव आणला जात असल्याचेही कळते आणि हे अत्यंत भयानक आहे. या घटनेमुळे गृहखात्याची अब्रू तर वेशीवर टांगली गेलीच, पण पोलिसच असा अत्याचार करत असतील तर महिलांनी न्याय मागण्यासाठी जायचं कुठं? असा प्रश्न निर्माण होतो.
महिला आयोगाने घेतली दखल
या प्रकरणी राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून सातारा पोलीस अधीक्षकांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. तसेच पीडित महिलेने याआधी तक्रार केली असल्यास तिला मदत का मिळाली नाही? याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या की, घडलेली घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणाची मी माहिती घेतली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केलेले आहेत. याप्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या ते दोघेही फरार आहेत. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी दोन पथक तयार करण्यात आलेली आहेत.





