Satara News : पोलादपूर- महाबळेश्वर आंबेनळी घाट मार्ग ६ दिवस सर्व वाहतुकीसाठी बंद !
पोलादपूर- महाबळेश्वर आंबेनळी घाट राज्य महामार्ग दि. ३ ते ८ जुलै या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

Satara News – मुसळधार पाऊस, वारंवार होणारे भूस्खलन, दरड कोसळण्याचा धोका आणि सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून पोलादपूर- महाबळेश्वर आंबेनळी घाट राज्य महामार्ग दि. ३ ते ८ जुलै या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
हा निर्णय महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, पोलादपूर तहसील प्रशासन आणि रायगड पोलिसांच्या अहवालानंतर घेण्यात आला आहे.
आंबेनळी घाट हा अतिसंवेदनशील भूस्खलन आणि दरडप्रवण क्षेत्र असून, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर माती घसरणे, दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे तसेच रस्त्यावर दगड येण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
अधिसूचनेनुसार घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर संरक्षक भिंती, ड्रेनेज सुधारणा, दरड हटविण्याची कामे आणि सुरक्षा उपाययोजना सुरू असून, या कामांदरम्यान वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, वाहनचालकांनी पोलादपूर-माणगाव-ताम्हिणी- पुणे-सातारा किंवा पोलादपूर-चिपळूण-पाटण- सातारा- कोल्हापूर या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, हवामानाचा अंदाज आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, आंबेनळी घाट परिसरात पुढील काही दिवस विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.





