Satara News : ‘विधानसभा निवडणुकीत जनता विरोधकांचे ‘एन्काऊंटर’ करेल’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोयनानगर – राज्यातील सर्व लाडक्या बहिणी स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ निवडणुकीसाठी सुरू केलेली नाही. ज्यांना दीड हजार रुपयांचे मोल कळत नाही, ते सावत्र भाऊ ही योजना फसवी असल्याचे बोलणार.
या योजनेमुळे सरकारची ताकद वाढली आहे. ही योजना कोणही ‘माईका लाल’ बंद करू शकणार नाही. उलट या योजनेत दिली जाणारी रक्कम दुप्पट होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तालुक्यात प्रेमाची दौलत जमवली आहे. हा उसळलेला जनसागर बघून विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई हे रेकार्डब्रेक मतांनी विजयी होऊन, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या फंडातून पाटण तालुक्यात झालेल्या 291 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी देशात तीन नंबरवर असलेल्या राज्याचा कारभार महायुतीच्या ताब्यात आला. तेव्हापासून केवळ सहा महिन्यांत राज्य एक नंबरवर आले आहे. हे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. जनतेला घरी बसणारा मुख्यमंत्री नको, तर जनतेत समरस होऊन काम करणारा मुख्यमंत्री हवा आहे.
येत्या शिवजयंतीच्या आधी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यात येईल. शंभूराज हे मोक्यावर ठोका मारणारे आमदार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत ते रेकार्डब्रेक मतांनी विजयी होऊन, विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करतील. पालकमंत्री देसाई म्हणाले, पाटण तालुक्याची धुरा मी हातात घेतली, तेव्हा तालुका विकासात खूप मागे होता.
येथे विकासाची गंगा आणण्याचे मोठे आव्हान होते. त्यावर मात करून तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाची मदत केली आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी पाटणमधून मला पुन्हा आमदार करावे. जयवंतराव शेलार यांनी आभार मानले.
750 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
या मेळाव्यात तारळे, कोयनाभागातील हेळवाक बौद्ध विकास मंडळाचे पदाधिकारी, गाडखो, ऐनाचीवाडी, रासाटी, कोंडावळे या गावांमधील 750 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला.





