Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम

कोयनानगर : पाटण ते धक्का या १३ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, सध्या एकाच बाजूचे काम प्राधान्याने सुरू आहे. यापैकी सुमारे ४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी एका बाजूचे काम पूर्ण करण्याचे, तर दुसरी बाजू पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता स्वप्नील धवन यांनी दिली.
दरम्यान, रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या पाटण शहरातील अतिक्रमणांवर कारवाईसाठी उद्यापासून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून, त्यांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवावे, अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पाटण शहरातील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांनी अनधिकृत अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केले आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी, धूळ, धोकादायक वळणे आणि सार्वजनिक गैरसोयींना नागरिक सामोरे जात होते.
रुंदीकरणाच्या कामात गटार बांधणी, दुतर्फा पायवाट व रस्त्याची उंची सुधारण्याचेही काम प्राधिकरणाकडून सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाटण शहरातून घाटमाथ्याकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ होणार असून, पर्यटन, शेती, आणि स्थानिक व्यवसायालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईची बातमी पसरताच शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी सहकार्याची भूमिका घेत अतिक्रमण स्वतःहून हटवण्यास सुरुवात केली आहे, तर काही व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.





