Satara News: महावितरणचा मोठा ‘घोटाळा’ उघड? ‘या’ एका मागणीसाठी रिपाइंचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
Satara News: एनएससी फंडातील कामांमध्ये अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार; साताऱ्यातील गैरप्रकारांविरोधात रिपाइं आठवले गटाचे गंभीर आरोप.

Satara News – सातारा विभागामध्ये महावितरणच्या वीज जोडणी निविदा प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये पदांचा गैरवापर आणि दलाली करणार्या अधिकार्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी रिपाइंचे (आठवले गट) दादासाहेब ओव्हाळ व जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांनी केली आहे. याप्रकरणी पंधरा दिवसांत निर्णय न झााल्यास महावितरण कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंबंधी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यकारिणी सदस्या पूनम निकाळजे, दामिनी निंबाळकर, मदन खंकाळ, प्रदीप नलावडे, रामभाऊ मदाडे, राजेंद्र भटकर, शाहरुख शेख, महेश पवार, विकास जाधव, अभिजित शिंदे, सूरज गाडे, वंदना सगळे, शीतल बल्लाळ उपस्थित होत्या. दादासाहेब ओवाळ म्हणाले, महावितरणच्या अधिकार्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही त्यांच्या बदल्या होत नाहीत.
शासनाच्या एनएससी फंडातून कामे होत असताना, कार्यकारी अभियंत्यांच्या मंजुरीसाठी अंदाजपत्रकाच्या 50 टक्के रक्कम मागितली जाते आणि नकार दिल्यास निविदेला मंजुरी दिली जात नाही. मर्जीतल्या ठेकेदारांनाच ठेके दिले जातात. लोकप्रतिनिधीचे नाव सांगून कर्मचार्यांवर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आणला जातो.
नीलेश पवार या खातेदाराने महावितरणकडे 100 केव्हीचा डीपी मागितला असता, त्याचा डीपी दुसरीकडे हस्तांतरित करण्यात आला. त्याऐवजी 60 केव्हीचा दिला गेला. असे अक्षम्य प्रकार सुरू आहेत. सातार्यात बर्याच ठिकाणी दलित वस्ती नसतानाही तेथे कामे करण्यात आलेली आहेत. या गैरप्रकाराची चौकशी करून, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अन्यथा महावितरण कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.





