Satara News : महाबळेश्वर पर्यटन महोत्सव २०२५; निसर्ग, संस्कृती आणि साहसाचा अनोखा संगम!

कोयनानगर : महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव २०२५ चे आयोजन दि. २ ते ४ मे दरम्यान करण्यात आले आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे या महोत्सवाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह पर्यटन विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाचे भव्य आयोजन – पर्यटकांसाठी सुवर्णसंधी!
या तीन दिवसीय महोत्सवात पर्यटकांना महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येणार असून, स्थानीय कला, संस्कृती, पारंपरिक खाद्यसंस्कृती, ऐतिहासिक वारसा, साहसी क्रीडा आणि पर्यटन सहली यांचा समावेश असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २ मे रोजी महोत्सवाचे उद्घाटन करणार असून, या वेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने हा भव्य सोहळा रंगणार आहे.
महोत्सवाची वैशिष्ट्ये आणि आकर्षणे:
स्थानिक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम
महाबळेश्वरच्या पारंपरिक लोककला, नृत्य, संगीत आणि नाट्य सादरीकरणासह नामवंत कलाकारांचे विशेष सादरीकरण आयोजित केले जाणार आहे.
स्ट्रॉबेरी आणि कृषी पर्यटन महोत्सव
महाबळेश्वरच्या सुप्रसिद्ध स्ट्रॉबेरी उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री यासह कृषी पर्यटनाला चालना देणारे विशेष कार्यक्रम.
साहसी खेळ आणि रोमांचक अनुभव
पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरींग
ट्रेकिंग आणि रॉक क्लायंबिंग
घोडेस्वारी आणि जलक्रीडा उपक्रम
ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन सहली
पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा आणि महाबळेश्वरच्या सुप्रसिद्ध ठिकाणांना भेटी
महाबळेश्वरच्या पुरातन मंदिरांचे दर्शन
गड-किल्ले पर्यटन सहली
स्थानिक हस्तकला आणि खाद्य महोत्सव
स्थानिक बचत गटांच्या हस्तकृतींचे प्रदर्शन आणि विक्री दालने
महाराष्ट्राच्या अस्सल चवींचा खाद्य महोत्सव
पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी विशेष कार्यक्रम
देशभरातील ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांना या महोत्सवासाठी विशेष आमंत्रण देण्यात आले असून, परिचय सहली आणि परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत.
सुविधा आणि निवास व्यवस्थापन
महोत्सवाच्या कालावधीत ५० निवासी टेंट आणि विविध दर्जाच्या निवास सुविधा उपलब्ध असतील.





