महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात सततच्या जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. नुकतेच रुंदीकरण आणि डांबरीकरण झालेला महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्ता चिखली शेडजवळ खचून वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग दरड हटवून रस्ता सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असले तरी पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. महाबळेश्वरपासून १०-१२ किमी अंतरावरील चिखली घाटात ही घटना घडली. पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची डोकेदुखी वाढली आहे. आतापर्यंत २५.७८७ इंच पावसाची नोंद झाली असून, चिखली ते झोळाची खिंड घाटात डोंगराळ भागात नवे पाण्याचे प्रवाह निर्माण झाल्याने भूस्खलन होऊन डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला आहे. यामुळे रस्त्याचे नुकसान झाले असून, पुढील काळातही दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. प्रवाशांना मांघरमार्गे झोळाची खिंड किंवा इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाने केले आहे. घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय देशपांडे, पोलिस निरीक्षक सांडभोर, हवालदार जे. व्ही. कांबळे आणि स. न. सय्यद परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहेत.