Satara News : कोयनानगर बनले प्रती पंढरपूर ! विद्यार्थ्यांच्या दिंडीत विठ्ठलभक्तीचा झंकार

कोयनानगर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला कोयनानगरमधील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमाने संपूर्ण परिसर ‘प्रती पंढरपूर’ बनला. भगव्या पताकांनी नटलेले रस्ते, टाळ-मृदंगाचा निनाद, आणि “ज्ञानोबा-तुकाराम” चा गजर करत निघालेली बालदिंडी हे दृश्य पाहून ग्रामस्थही क्षणभर पंढरपूरच्या वारीत असल्याचा अनुभव घेत होते.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून हातात टाळ, मुखात अभंग आणि ओठांवर ‘माऊली’चा जयघोष घेऊन दिंडीमध्ये सहभाग घेतला. डोक्यावर तुळशीचे रोप, हाती भगवे झेंडे, सुंदररित्या सजवलेली विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, हे सर्व पाहून परिसरात भक्तिभाव दाटून आला.
शाळेच्या शिक्षक, शिक्षिका आणि पालकांनीही या उपक्रमात खांदा मिळवून दिंडीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची ओळख व्हावी, संस्कार घडावेत आणि सांस्कृतिक जाणीव वाढावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. “पंढरीची वारी घरपोच आणण्याचा प्रयत्न आज कोयनानगरच्या विद्यार्थ्यांनी केला आणि तो अत्यंत यशस्वी ठरला,” अशी प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.





