satara news : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात; सी. डी. देशमुख यांची जयंती उत्साहात

सातारा – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे वित्तीय समावेशक अध्यासन केंद्र व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे बँक मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि . 15) रोजी भारताचे थोर अर्थप्रशासक सर सी.डी. देशमुख यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बँकर श्रीराम नानल होते. ‘स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या जडणघडणीत व विकासामध्ये सी. डी. देशमुख यांची भूमिका’ या विषयावर डॅा. ज्ञानदेव म्हस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर व देशाचे अर्थमंत्री म्हणून काम करीत असताना त्यांनी देशाच्या वित्तीय क्षेत्राची पायाभरणी करण्यात अनमोल योगदान दिले. प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करीत असताना सी. डी. देशमुख यांनी देशाचे मौद्रिक, राजकोषीय तसेच लोकप्रशासनाची घडी व्यवस्थित बसवण्याबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थकारणातही भारताचे प्रतिनिधित्व केले, असे मत डॉ. म्हस्के यांनी व्यक्त केले.
शिवछत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाचे सर्व विभागाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. के. सावंत, डॉ. राजन मोरे, डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. आर. आर. साळुंखे तसेच विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार व विद्यापीठातील सर्व विभागातील अधिकारी व संचालक उपस्थित होते.
वित्तीय समावेशक अध्यासनाचे चेअर प्रोफेसर डॉ. राजशेखर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. व्ही.डी. पाटील यांनी आभार मानले. सातारा – बोलताना प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. व्ही. के. सावंत, डॉ. राजन मोरे, डॉ. अनिलकुमार वावरे आदी.





