लोणंद : लोणंद (ता. खंडाळा) येथील माळी आळी परिसरात भाड्याने राहणाऱ्या गणेश संतोष गायकवाड (वय 22, रा. पिंपळसुटी ता. शिरूर, जि. पुणे, सध्या लोणंद) या 22 वर्षीय तरुणाचा काल रात्री खून झाल्यानंतर लोणंद पोलिसांनी अवघ्या दोन तासांत त्याबाबतचा उलगडा केला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माळी आळीतील गोकुळ क्षीरसागर यांच्या भाड्याच्या खोलीत गणेश गायकवाड वास्तव्यास होता. सोमवारी दि. 27 रोजी रात्री 8 ते 9.15 दरम्यान अज्ञात व्यक्तीने कमरेच्या पट्ट्याने त्याचा गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी नामदेव जयसिंग लगट (वय 37, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी लोणंद पोलिसांत फिर्याद दिली आहे. अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक खांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तसेच लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी पाहणी केली. नंतर प्राथमिक तपासात घटनेची माहिती देणारा त्याच्याच खोलीत राहत होता व त्याच्या वागण्यात संशयास्पद बाबी आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर त्याच्याच कबुली जबाबातून खुनाचा उलगडा झाला. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. संशयित अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक, फिंगर प्रिंट आणि डॉग स्क्वॉड पथकांना घटनास्थळी पाचारण करुन आवश्यक पुरावे हस्तगत केले. पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे, डीबी पथकाचे अधिकारी तसेच पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा अवघ्या दोन तासांत उलगडा झाला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.