Satara News : माजी क्रीडा राज्यमंत्री शामराव आष्टेकर यांचे निधन

Shamrao Ashtekar : कराड उत्तरचे माजी आमदार व माजी क्रीडा राज्यमंत्री जनार्दन ऊर्फ शामराव बाळकृष्ण आष्टेकर (वय ९१) यांचे बुधवारी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. कराड उत्तरमधून सलग दोनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. तर क्रीडा राज्यमंत्रिपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.
कराडमधील गुरूवार पेठेत राहणारे जनार्दन ऊर्फ शामराव आष्टेकर 1980 च्या दशकात पालिकेमध्ये सेवेत होते. त्यांच्या कुटुंबाला कसलाही राजकीय वारसा अथवा पार्श्वभूमी नव्हती. शरद पवारांचे त्याकाळचे निष्ठावंत कार्यकर्ते, एवढीच त्यांची त्यावेळची ओळख. मात्र, याच कालावधीत घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये शामराव आष्टेकर हे आमदार आणि क्रीडा राज्यमंत्रीही झाले.
1980 च्या दशकात काँग्रेसशी फारकत घेत शरद पवार यांनी पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन केला. या दलाच्या माध्यमातून त्यांनी 1985 च्या निवडणुकीत राज्यभरात नव्या चेहर्यांना संधी दिली. त्यामध्ये कराड उत्तरेतून त्यांनी जनार्दन ऊर्फ शामराव आष्टेकर यांना उमेदवारी दिली. मुळातच आष्टेकर मितभाषी होते. शहरात त्यांचा सायकलवरून फेरफटका असायचा. ‘शाम आष्टेकर’ नावाने ते सर्वपरिचित होते.
निवडणुकीला उभे राहिल्यानंतर प्रचारादरम्यान घरोघरी त्यांचे स्वागत झाले. आणि त्याच उत्साहात त्यांना मतदानही झाले. त्यामुळे कराड उत्तरेतून ते निवडून आले. १९९० मधील निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले.या त्यांना क्रीडा राज्यमंत्री पद मिळाले. या पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. तसेच पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीतही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. सलग दोनवेळा त्यांनी कराड उत्तरचे प्रतिनिधीत्व केले. मात्र, आमदार असताना आणि त्यानंतरही कराडातील स्थानिक राजकारणात त्यांचा कसलाही हस्तक्षेप नव्हता. कालांतराने राजकारणापासून ते पूर्णपणे अलिप्त राहिले. तसेच राजकीय कारकिर्दीनंतरही त्यांनी त्यांचे राहणीमान सामान्य ठेवले होते.





