Satara News : आणखी १७ शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रे अयोग्य; आठ टप्प्यांमध्ये ३७९ जणांची तपासणी

सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने ५८१ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सुरू केली आहे. सात टप्प्यांमध्ये ३९० पैकी ३५२ शिक्षकांची तपासणी होऊन, यामध्ये ७२ शिक्षकांची प्रमाणपत्रे अयोग्य ठरवण्यात आली होती, तर ३८ जण तपासणीस गैरहजर होते.
आठव्या टप्प्याचा अहवाल सोमवारी आला असून, त्यामध्ये २७ शिक्षकांना तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यात १७ अयोग्य, ८ योग्य प्रमाणपत्रे आली असून, दोन जणांचा निर्णय प्रलंबित आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी संबंधितांना निलंबनाची नोटीस बजावली. पहिल्या टप्प्यात ७५ शिक्षकांची तपासणी होऊन, ५७ प्रमाणपत्रे योग्य व १२ अयोग्य ठरली होती. चार शिक्षक तपासणीस गैरहजर होते.
दुसर्या टप्प्यात ७६ शिक्षकांची तपासणी होऊन, ६२ प्रमाणपत्रे योग्य व १३ अयोग्य ठरली होती. सात शिक्षक तपासणीस गैरहजर होते. तिसर्या टप्प्यात ४९ शिक्षकांची तपासणी होऊन, ३४ प्रमाणपत्रे योग्य व ११ अयोग्य ठरली होती. चार शिक्षक तपासणीस गैरहजर होते. चौथ्या टप्प्यात ४९ शिक्षकांची तपासणी होऊन, ४० प्रमाणपत्रे योग्य व ८ अयोग्य ठरली होती. सहा शिक्षक तपासणीस गैरहजर होते.
पाचव्या टप्प्यात ५१ शिक्षकांची तपासणी होऊन, ३२ प्रमाणपत्रे योग्य व १६ अयोग्य ठरली होती. सहा शिक्षक तपासणीस गैरहजर होते. सहाव्या टप्यात २७जणांना तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १८ प्रमाणपत्रे योग्य, दोन अयोग्य व तीन जण गैरहजर राहिले. सातव्या टप्यात ३६ जणांना तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १३ प्रमाणपत्रे योग्य व १० अयोग्य आढळली आहेत.
आठ शिक्षक गैरहजर होते. आठव्या टप्प्यात २७ जणांना तपासणीस बोलावण्यात आले होते. यातील १७ प्रमाणपत्रे अयोग्य व ८ योग्य असून, दोन जणांबाबत निर्णय प्रलंबित आहे. प्रमाणपत्रे अयोग्य असलेल्या आणि गैरहजर शिक्षकांना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी निलंबनाच्या नोटिसा बजावल्या आहेत. यातील काही शिक्षकांनी प्रशासनाकडे खुलासे सादर केल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.





