Satara News : जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मेढा येथील शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी

मेढा : जावळी तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे, माथाडी नेते विठ्ठलराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पंचायत समिती कार्यालयापासून बाजार चौक, वेण्णा चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी तहसीलदार हणमंतराव कोळेकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांचा आक्रोशमय मोर्चा
“ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा खुर्च्या खाली करा,” अशा घोषणांनी मोर्चादरम्यान परिसर दणाणला. सततच्या पावसामुळे तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन, भुईमूग, घेवडा, ज्वारी यांसारख्या पिकांची पेरणीच करता आली नाही, तर २० टक्के शेतकऱ्यांची पेरणी केलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सुरेश पार्टे, विठ्ठलराव गोळे, माजी सभापती मोहनराव शिंदे, बाजार समिती संचालक बुवासाहेब पिसाळ, महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष समिंद्रा जाधव, नारायण शिंगटे, रूपाली भिसे यांनी केली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
शेतकऱ्यांचे नुकसान आणि मागण्या
निवेदनात नमूद करण्यात आले की, जावळी तालुक्यातील बहुसंख्य अल्पभूधारक शेतकरी माथाडी कामगार म्हणून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे येथे काम करतात आणि शेतीद्वारे उदरनिर्वाह करतात. १६ मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचे मोसमी पावसात रूपांतर झाले असून, सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी हंगामी पिकांची पेरणी होण्याची शक्यता नाही. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. महसूल मंडल अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील नुकसानीचे पंचनामे करणे अपेक्षित होते, परंतु अद्याप कोणतीही यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निवारण योजनेतून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
आंदोलनाचा इशारा
मोर्चात आनंदराज जुनघरे, गोपाळराव बेलोशे, रामदास पार्टे, राजश्री शिंदे, सोमनाथ कदम, रोहित रोकडे, प्रकाश कदम, विलास दुंदळे, राम कदम, चंद्रकांत गवळी, समीर डांगे, सुनील फरांदे, राजेंद्र कदम, अमृतलाल शेडगे, नारायण दळवी, तेजस्विनी केसकर, शैलजा कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. विठ्ठलराव गोळे म्हणाले, “सततच्या पावसामुळे शेतकरी संकटात आहे. शासनाने एक महिन्याच्या आत ओला दुष्काळ जाहीर न केल्यास पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल.”





