Satara News : उंब्रजमध्ये रिमझिम पावसात भक्तिमय वातावरणात भीम-कुंती भेटीचा उत्साहपूर्ण सोहळा संपन्न

उंब्रज : शेकडो वर्षांची परंपरा असलेला उंब्रज (ता. कराड) येथील भीम-कुंती यात्रा सोहळा रिमझिम पावसात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. ‘भीमसेन महाराज की जय’ आणि ‘कुंती माता की जय’च्या जयघोषात ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा जपणारा हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यंदा कुंती मातेच्या अश्वारूढ रथात विराजमान होण्याचा मान बापूसो शंकर जाधव यांनी १ लाख ११ हजार १११ रुपयांची सर्वाधिक बोली लावून मिळवला.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी होणारा हा उत्सव बेंद्रापासून सुरू होतो, जिथे माय-लेकांच्या भेटीचा सोहळा मुख्य आकर्षण ठरतो. सकाळपासूनच भीमसेन मंडळ आणि ग्रामस्थांनी तयारीला सुरुवात केली होती. सकाळी ११ वाजता भीम मंडपात कुंती मातेच्या मूर्तीला रथात घेऊन बसण्यासाठी लिलाव बोलीला सुरुवात झाली. बापूसो जाधव यांनी सर्वाधिक बोली लावत हा बहुमान पटकावला.
परंपरेनुसार, भैरवनाथ मंदिराजवळील महामुनी यांच्या घरात कुंती मातेच्या मूर्तीचे विधिवत पूजन झाले. फुलांनी सजविलेल्या अश्वारूढ रथात जाधव यांनी कुंती मातेला घेऊन स्थानापन्न केले. यावेळी उपस्थितांनी ‘कुंती माता की जय’चा गजर केला. यानंतर महामुनी यांच्या घरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. वाद्यवृंद, बँड पथक, ठेका धरणारी तरुणाई आणि भाविकांचा लवाजमा यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले.
मिरवणूक महामुनी यांच्या घरापासून भैरवनाथ मंदिर, चावडी चौक, मुख्य रस्त्याने बाजारपेठ, सेवा रस्ता, पाटण-तिकाटणे मार्गे कॉलेज रस्त्यावरील मारुती मंदिराला वळसा घालत पुन्हा बाजारपेठेत पोहोचली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या महिला आणि नागरिकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात कुंती मातेचे दर्शन घेतले. सायंकाळी ‘पुत्र भीम’ आणि ‘कुंती माता’ यांच्या भेटीचा अनोखा सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला. यावेळी मानकऱ्यांनी विधिवत पूजा केली, तर खण, नारळ आणि घोणची यांचा लिलावही भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने पार पडला.
यात्रेदरम्यान बाजारपेठेत फिरते पाळणे, खेळण्यांचे स्टॉल, मेवा-मिठाईंची दुकाने आणि करमणुकीची साधने यामुळे चैतन्य निर्माण झाले. लहान मुले आणि मोठ्यांनी फिरत्या पाळण्याचा आनंद लुटला. भाविकांनी श्रद्धेने नवस बोलून पूर्ण झाल्यावर नारळाचे तोरण आणि रोख रकमेच्या माळा अर्पण केल्या. या उत्सवाने उंब्रजचा बाजारपेठ आणि परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात न्हाला.





