Satara News : शाहू स्टेडियममध्ये सिंथेटिक ट्रॅकला मान्यता : उदयनराजे भोसले

सातारा : येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये सिंथेटिक ट्रॅकसाठी आणि क्रीडा साहित्य सुविधांकरिता 23 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या ट्रॅकचा आणि सुविधांचा येथील खेळाडूंना उपयोग होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
जलमंदिर येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे की सिंथेटिक ट्रॅक व इतर क्रीडा सुविधांसाठी 15 कोटी रुपयांच्या कामाला मान्यता देण्यात आली होती. आज सातारा जिल्हा क्रीडा संकुल समितीला पूर्वी मंजूर असलेल्या आठ कोटींच्या प्रशासकीय मान्यतेसह 15 कोटी रुपये अनुदान रकमेची वाढ करण्यात येऊन एकूण 23 कोटी रुपयांच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीमधून प्रामुख्याने जिल्हा क्रीडा संकुलामध्ये 400 मीटरच्या सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती करण्यात येणार आहे.
छत्रपती शाहू स्टेडियम येथे सिंथेटिक ट्रॅक निर्माण केला पाहिजे, अशी वेळोवेळी आग्रही भूमिका राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याच्या क्रीडा संकुल समितीकडे वेळोवेळी मांडली होती.
जिल्हा क्रीडा संकुलाचे सचिवांकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्याबाबत सूचना केल्या होत्या. या सर्वांचा परिणाम म्हणून पूर्वी मंजूर असलेले आठ कोटी आणि आता मंजूर झालेले 15 कोटी अशा एकूण 23 कोटीच्या सुधारित प्रशासकीय कामांना मान्यता देण्यात आली आहे.
सिंथेटिक ट्रॅकमुळे ॲथलेटिक्समधील विविध प्रकारांच्या सरावासाठी धावपटूंना एक चांगली सुविधा निर्माण होईल आणि जिल्ह्याच्या धावपटू परंपरेला एक वेगळी चालना मिळेल. हे काम लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.





