satara | महायुतीच्या तंबूमध्ये ऑल इज नॉट वेल

सातारा, {संदीप राक्षे} – महायुतीच्या तंबूमध्ये वरवर राजकीय वातावरण शांत असले तरी अंतर्गत खदखद प्रचंड वाढली आहे. महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसने फिरवलेली पाठ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सन्मानाने वागणूक देण्याची केलेली मागणी यामुळे महायुतीच्या गोटात अस्वस्थता अद्याप कायम आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी आणि रिपाईचा सन्मान याचे डॅमेज कंट्रोल करावे लागणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचाराला जोरदार सुरुवात केली असली तरी त्यांच्या अधिकृत उमेदवारीच्या घोषणेसंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळकाढूपणा का चालवलेला आहे ही अस्वस्थता महायुतीच्या मेळाव्यात प्रकट झाली. उदयनराजे भोसले यांनी वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, सातारा त्यानंतर कराड उत्तर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.
मात्र, या प्रचार दौऱ्यामध्ये उदयनराजे मित्र समूह वगळता भाजपचे पदाधिकारी कुठेच दिसत नाहीत. केवळ भाजपच्यावतीने आयोजित कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते. उदयनराजेंबरोबर प्रचारात भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम दिसत नसल्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाची आहे की केवळ उदयनराजेंची असा प्रश्न राजे समर्थकांना पडला आहे. महायुतीमधल्या अजित पवार गटाचीही नाराजी जाणवू लागली आहे.
साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक जागा आहे. गेल्या 24 वर्षापासून राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराला पराभूत होऊ दिलेले नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या विभाजनामुळे अजितदादा गटाचे राजकीय बळ कमी पडल्याने जागा सोडावी लागते की काय अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी गटाकडे सुद्धा सक्षम उमेदवार आहेत तर भाजपकडे खासदार उदयनराजे भोसले वगळता दुसरा तगडा उमेदवार नाही.
आमदार मकरंद पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बंधू नितीन पाटील यांच्या बाजूने अप्रत्यक्ष मांडणी केली होती. जिल्हा बँकेचे चेअरमन असणाऱ्या नितीन काका पाटील यांनीसुद्धा त्या पद्धतीने केलेली मोर्चे बांधणी अजितदादांच्या नजरेत आहे.
मात्र, महायुतीच्या रस्सीखेचीमध्ये भाजपचे पारडे जड राहिल्यामुळे मकरंद आबा व नितीन काका हे प्रचार सभांमध्ये सहभागी होत नसल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीचा धर्म पाळला जावा असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकरंदआबा यांना घातले होते.
मकरंदआबा या शब्दाला जागत वाईमध्ये प्रचार यंत्रणा राबवत असले तरी तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. एकाच घरामध्ये अनेक सत्ता केंद्रांचे झालेले केंद्रीकरण आणि वाई तालुक्याचा रखडलेला विकास अशी सुप्त खदखदही आहेच.
दुसरीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून आम्हाला सन्मानाची वागणूक द्या असे सांगितले अन्यथा लोकसभेला आम्ही स्वतंत्र उमेदवार उभा करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. अर्थात हा इशारा त्यांच्या दबाव तंत्राचा भाग असू शकतो.
नाराज घटकांचे महायुतीपुढे आव्हान
सातारा जिल्ह्यामध्ये रिपाईच्या नेतृत्वाला मानणारा एक मतदार गट आहे जो मतदानाच्या आकडेवारीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे अशा रुसव्या फुगव्यांची दखल वरिष्ठ कार्यकारिणीने तातडीने घ्यावी. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीच्या घोषणेसह त्यांचा अर्ज कधी भरला जाणार याचाही कार्यक्रम तातडीने जाहीर करावा, अशी राजे समर्थकांची मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे चाणक्य समजले जातात.
त्यांना या गोष्टींवर डॅमेज कंट्रोल करावे लागेल, उदयनराजे यांचे नाव मागे ठेवून बी प्लॅन सादर करणे आणि मराठा मतदारांचा रोष ओढवून घेणे हे भाजपच्या थिंक टॅंकमध्ये निश्चित नसणार. महाविकास आघाडीने समन्वयाने 48 जागांची राजकीय पेरणी करत एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्ह्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना असणारी राजकीय नाराजी तातडीने दूर करावी लागेल अन्यथा ती धोक्याची घंटा ठरू शकते





