Satara News: निसर्गाची देणगी जपण्यासाठी महासंकल्प! ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’साठी सातारा सज्ज
Satara News: पाण्याचा अपव्यय टाळा अन् प्रत्येक थेंब जिरवा; जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांचे नागरिकांना आवाहन.

Satara News – महाराष्ट्र जलसमृद्ध झाला पाहिजे ही शासनाची भूमिका असून प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या चळवळीला आपले पाठबळ दिले पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा वाचवण्याबरोबरच जिरवण्याबरोबरच पाण्याचा अपव्यव टाळला पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी केले. जलसंधारणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजवाडा ते शिवतीर्थ भव्य वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
या वॉकेथॉनला अध्यक्षा डॉ. शिंदे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसरंक्षक अमोल सातपुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, शालेय स्तरावरूनच जलसाक्षरता निर्माण करण्यावर भर दिला जावा.
माती अडवून पाणी जिरवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य-जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, पाणी हे केवळ निसर्गाची देणगी नसून ते मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे. माती अडवणे आणि पाणी जिरवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ही वॉकेथॉन केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, यातून मिळालेली जलप्रबोधनाची प्रेरणा तळागाळापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या वॉकेथॉनमध्ये पाणी बचतीच्या व संवर्धनाच्या घोषणा देत संपूर्ण शहर उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाले होते. यावेळी उपस्थितांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली.





