Satara News : 2 लाख भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन; गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवलेतील समाधी मंदिरात अलोट गर्दी

दहिवडी : श्री क्षेत्र गोंदवले येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दोन लाखांहून अधिक भाविकांनी सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली. ‘श्री राम जयराम जय जय राम’च्या जयघोषाने गोंदवले नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत आठ तास थांबून श्रींच्या चरणी नतमस्तक होण्याचा आनंद लुटला.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून हजारो भाविक कालपासूनच मुक्कामाला आले होते. सकाळी मंदिरात विधिवत पूजा, अभिषेक आणि लघुरुद्र यांसह धार्मिक कार्यक्रम पार पडले. विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या समाधीची पूजा झाली, तर कीर्तन सेवा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय बनले. दोन किलोमीटरहून अधिक लांब रांगा असूनही, देवस्थान समितीने मुख दर्शन आणि पादुका दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था केल्याने दर्शन प्रक्रिया सुलभ झाली. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला, तर अनेकांनी गुरुमंत्र घेतला.
देवस्थान समिती, दहिवडी पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायतीने वाहन पार्किंग आणि बंदोबस्ताची उत्तम व्यवस्था केली. मंदिर परिसरात आणि बाहेर हार, फुले, पेढे आणि नारळाच्या प्रसादासाठीही गर्दी उसळली. श्री ब्रह्मचैतन्य महाराज ट्रस्टच्या चैतन्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदा नेहमीपेक्षा अधिक गर्दी अनुभवायला मिळाली. रामनामाची शिदोरी घेऊन भाविक तृप्त मनाने परतताना दिसले.





