Satara Municipal Council – सातारा पालिकेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. मुख्याधिकार्यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप करत, नगरसेविका सावित्री बडेकर यांनी खळबळ उडवून दिली. न्याय न मिळाल्यास सभागृहातच बसकण मारून, आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. प्रेक्षा गॅलरीत उपस्थित असलेले त्यांचे पती विजय बडेकर यांनी तेथूनच मागणी मान्य न झाल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला. पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये शहराचे अंदाजपत्रक सादर होत असताना, पहिल्या पंधरा मिनिटांतच गोंधळाला सुरुवात झाली. प्रेक्षा गॅलरीतून सभेत हस्तक्षेप करणे संकेताला धरून नाही. मात्र, आपली पत्नी व नगरसेविका सावित्री बडेकर यांना धक्काबुक्की झाली आहे, याची दखल घेऊन, मुख्याधिकार्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विजय बडेकर यांनी प्रेक्षा गॅलरीतून केली. मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या केबिनमध्ये झालेल्या चर्चेवेळी त्यांनी आपल्याला सन्मानाची वागणूक दिली नाही. सभेचे कारण सांगून, तेथून निघून येताना धक्काबुक्की केली, असा आरोप सावित्री बडेकर यांनी सभागृहात केला. याबाबत त्यांनी थेट नगराध्यक्षांना विचारणा केली. यामध्ये भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. सावित्री बडेकर यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. अखेर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी हस्तक्षेप करत, सभा संपल्यानंतर संबंधित प्रसंगाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आणि या घटनेवर आपल्या केबिनमध्ये चर्चा करून, निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तेव्हा सावित्री बडेकर शांत झाल्या. काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी सुषमा राजेघोरपडे यांनी प्रेक्षा गॅलरीतून निषेधाचा नारा दिला. शहरात आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना, महिला प्रसाधनगृहे बंद आहेत. काही प्रभागांमध्ये तर त्यांचा अभाव आहे. याकडे प्रशासन कधी लक्ष देणार, असे म्हणत त्यांनी आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकार्यांनी प्रेक्षा गॅलरीतून घोषणाबाजी केली. बजेट मांडताना सर्वसामान्य सातारकरांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप शहर सुधार समितीचे सदस्य अस्लम तडसरकर यांनी केला. बजेटमधील तरतुदी किती सातारकरांना माहीत आहेत, अशी विचारणा त्यांनी प्रेक्षा गॅलरीतून केली. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी गॅलरीतील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले, तरीसुद्धा अर्धा तास गोंधळ सुरू होता. त्यानंतर शोकप्रस्ताव आणि अभिनंदनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन, अंदाजपत्रकीय सभेला सुरुवात झाली.