“भाजप आता भारतीय जनता लॉंड्री झाला” म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना भाजप खासदार म्हणाले,”आपण मागे काय केलं…”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “भाजपा हा आधी पक्ष होता आता भारतीय जनता लॉंड्री झाला आहे”, असे विधान केले होते. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यालाआता भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे. भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रत्त्युत्तर देत ‘आपण मागे काय केलं, याचा विचार करूनच वक्तव्य करायला हवे,’असे म्हटले आहे.
कपिल पाटील यांनी यावेळी बोलताना,“आपल्याला आठवत असेल तर २०१९ च्या निवडणुकीला उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भ्रष्टाचाराचे पुस्तक छापली होती. भर सभेत त्यांनी ते पुस्तक दाखवले होते. आता दोघेही एकत्र आले आहेत. याचा अर्थ आम्ही काय घायचा? खरं तर राजकारणात अशी स्थित्यंतरं येत असतात, जो-तो आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत असतो. त्यामुळे आपण मागे काय केलं, याचा विचार करूनच वक्तव्य करायला हवे”, असे प्रत्युतर सुप्रिया सुळे यांना दिले आहे.
दरम्यान, यावेळी पाटील यांनी ‘सामना’तून करण्यात आलेल्या टीकेलाही उत्तर दिले. “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची होती. ही भाजपाची भूमिका नव्हती. त्यामुळे भाजपा त्यांचा काँट्रॅक्ट किलर म्हणून वापर करते, असा आरोप करणं योग्य नाही”, असेही त्यांनी येवेळी म्हटले.
दरम्यान, काल (रविवारी) पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी महागाई आणि बेरोजगारीवरून भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी इतर पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात घेण्यावरून टोला लगावला होता. “भाजपा हा आधी पक्ष होता आता भारतीय जनता लॉंड्री झाला आहे”, असे त्या म्हणाल्या होत्या.





