Satara Municipal Council : गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; पालिकेत लागू झाली नवी ‘कडक’ नियमावली
Satara Municipal Council : नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी १० ते १ मुख्यालयात थांबणे बंधनकारक; हालचाल रजिस्टरमुळे कामात येणार पारदर्शकता.

Satara Municipal Council – पालिकेमधील प्रशासक राज्य संपून आता खर्या अर्थाने मेहरबानांचे राज्य सुरू झाले आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या समन्वयाने पालिका कर्मचार्यांसाठी वेळेची आणि कामाच्या पद्धतीची आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.
कर्मचार्यांना सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सव्वा सहा अशी वेळ ठरवण्यात आली आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी पालिकेत सुरू करण्यात आली आहे. तसेच पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांनी स्वच्छ गणवेशांमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. पालिकेतील 27 आस्थापनांचे जितके कर्मचारी आहेत,
त्या सर्व कर्मचार्यांना सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये नागरिकांच्या कामासाठी नगरपालिकेमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. सकाळच्या वेळेत नागरी सुविधा केंद्र, जन्म मृत्यू विभाग, कर भरणा विभाग यामध्ये नागरिकांची गर्दी असते. तसेच बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागामध्ये सुविधा मिळण्याच्या संदर्भाने नागरिक निवेदने देण्यासाठी येत असतात.
या विभागातील तसेच इतर कर्मचार्यांना सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये पालिका मुख्यालयात थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून नागरिकांची कामे होऊन त्यांना सुविधा देणे शक्य होणार आहे. या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या 27 विभागांमध्ये या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
हालचाल रजिस्टर ठेवणे बंधनकारक
पालिकेचे कर्मचारी विशेषत: आरोग्य आणि बांधकाम विभागाची यंत्रणा दुपारनंतर सातारा पालिकेतून गायब असते, असा पूर्वानुभव आहे. या विभागात दुपारनंतर चौकशी केली असता साहेब भागात गेले किंवा आरोग्य कर्मचारी प्रभागात गेलेत असे छापील उत्तर देण्यात येते. त्यामुळे पालिकेचा कारभार सुनियोजित आणि पारदर्शक पद्धतीने चालावा या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत.
त्यामध्ये हालचाल रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे. पालिका कर्मचार्यांनी आपला विभाग सोडताना कोणत्या कामासाठी, कोठे जात आहोत, याचे वर्णन रजिस्टर मध्ये नोंदवायचे आहे. कर्मचार्यांना बायोमेट्रिक प्रणाली बंधनकारक आहे.
त्यातील कामाचे तास मोजूनच त्यांचे वेतन अदा करणे संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कर्तव्य कसुरी करणार्या कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला आहे. या आचारसंहिता कार्यक्रमाचे सर्व कर्मचार्यांनी स्वागत केले आहे.





