सातारा | पुसेगाव, खटावमध्ये पोलिसांकडून संचलन

पुसेगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पुसेगाव व खटाव येथे पोलिसांनी संचलन केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गाव पातळीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणेकडून आधीच खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव व खटावमध्ये संचलन करण्यात आले. यामध्ये जिल्हा पोलीस दल व आयटीबीपी, केंद्रीय सुरक्षा दल यांच्यावतीने संयुक्त संचलन झाले.
विधानसभा निवडणुकीसाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, ही निवडणूक शांततेत पार पाडावी, यासाठी आता पोलिसांची सर्वत्र करडी नजर असणार आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी सांगितले.





