वडूज : एनकुळ, ता. खटाव येथील हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा वडूज पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये शोध घेऊन, तिला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. याबाबत माहिती अशी, एनकुळ येथील या मुलीने दहावीच्या परीक्षेनंतर सुट्टीमध्ये एमएससीआयटी या कोर्ससाठी वडूज येथील हायटेक कॉम्प्युटर येथे प्रवेश घेतला होता. ती रोज कोर्सला जाऊन, घरी परत येत होती. ती शनिवारी (दि. 12) क्लासला गेली. ती सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने, घरच्या लोकांनी हायटेक कॉम्प्युटरचे संचालक निकम यांच्याकडे विचारणा केली. मात्र, ती कोर्ससाठी आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या आजोबांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस निरिक्षक घनशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला. संबंधित मुलीच्या मैत्रिणी, संगणक प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि मुलीच्या पाहुण्यांकडे चौकशी केली असता, ती मुलगी पंढरपूर येथे गेल्याची माहिती मिळली. पोलिसांनी पंढरपूर येथे जाऊन, त्या मुलीला ताब्यात घेतले. या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक शिंदे, हवालदार कुंडलिक कटरे, विजय खाडे, महिला अंमलदार धावरे यांचे सहकार्य लाभले.